

TOXIC OTT release दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा बहुचर्चित चित्रपट 'टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होण्याची शक्यता आहे. थिएटरमधील कमाई आणि शोच्या संख्येत झालेली मोठी घट पाहता, निर्मात्यांनी हा चित्रपट मुदतीआधीच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा विचार सुरू केल्याचे समजते.
'केजीएफ'च्या ऐतिहासिक यशानंतर यश मोठ्या पडद्यावर परतत असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाची कथा जुन्या काळातील गोव्याची पार्श्वभूमी आणि तिथल्या ग्लॅमरस जगामागे सक्रिय असलेल्या एका शक्तिशाली ड्रग्ज कार्टेलवर आधारित आहे. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या कथेवर प्रेक्षक आणि समीक्षकांनी तीव्र आक्षेप नोंदवले. सोशल मीडियावर मिळालेल्या प्रचंड नकारात्मक प्रतिक्रियांमुळे प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली आणि चित्रपटाचे मोठे व्यावसायिक नुकसान झाले.
चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २३९.३० कोटी रुपयांची दमदार कमाई करत शानदार सुरुवात केली होती. परंतु, दुसऱ्याच आठवड्यात कमाईचा आलेख झपाट्याने घसरून केवळ ८.९४ कोटी रुपयांवर आला. आठवडाभरात कमाईत झालेली ही घसरण तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक आहे. प्रेक्षकांच्या घटत्या संख्येचा थेट फटका शोच्या प्रमाणावरही बसला. पहिल्या दिवशी देशभरात २४,५७९ शोसह प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे शो २१ व्या दिवसापर्यंत थेट २४८ वर आले, म्हणजेच सुरुवातीच्या तुलनेत शोच्या संख्येत ९९ टक्क्यांची प्रचंड घट नोंदवली गेली.
कधी आणि कुठे होणार प्रीमियर?
'१२३ तेलुगू'च्या वृत्तानुसार, हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना तो घरबसल्या पाहण्याची संधी मिळेल. तथापि, ओटीटी प्रदर्शनाची तारीख आणि प्लॅटफॉर्मबाबत निर्मात्यांकडून अथवा 'झी५'कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ओटीटीसाठी नवीन एडिट केलेली आवृती ?
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा डिजिटल प्रतिसाद सुधारण्यासाठी निर्माते ओटीटीसाठी एक वेगळी किंवा नव्याने संपादित केलेली आवृत्ती सादर करण्याचा विचार करत आहेत. यावर अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी निर्मात्यांचा हा संभाव्य निर्णय चित्रपटाचे नुकसान भरून काढण्यात कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.