‘चाबुक ’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार

‘चाबुक ’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: 'चाबुक' म्हटला की लगेच प्राण्यांना काबूत ठेवण्यासाठी किंवा उधळलेल्या जनावरांना शांत करत आपल्या म्हणण्यानुसार वागायला लावणारं प्रभावी अस्त्र आठवतं, पण 'चाबुक' कधी नियतीचा, व्यवस्थेचा, प्रारब्धाचा, विचारांचा, रुढी-परंपरांचाही असू शकतो. त्यामुळं सर्वच बाबतीत चाबूकाचं महत्त्व अतिशय वेगळं आहे. माणसाला कधी- कधी आपला स्वभाव किंवा विचार काबूत ठेवणं शक्य होत नाही, तेव्हा विचारांच्या चाबकाचे फटकारे त्याच्या मनावर उमटतात. थोडक्यात, शरीरालाच नव्हे तर मनालाही काबूत ठेवण्याचं काम 'चाबुक' करतो. असाच एक 'चाबुक' आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

कल्पेश भांडारकर हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. थोरले बंधू मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी हिंदीतल्या अनेक दिग्गजांसोबत चित्रपट केले आहेत. यानंतर ते आता स्वत:ची पहिली मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत.

'श्रीष्टी मोशन पिक्चर कंपनी' च्या बॅनरखाली 'चाबुक' या मराठी चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना कल्पेश वासुदेव भांडारकर आणि समीर धर्माधिकारी यांची आहे. 'चाबुक' चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना कल्पेश सांगतात की, 'वाट चुकलेल्याला जनावराला सरळ मार्गावर आणण्यासाठी चाबुक उपयोगी येतो. प्रत्येक व्यक्तीला आपण जे वागतो तेच बरोबर आहे असं वाटत असते. आपल्या विचारांच्या, वागण्याच्या चष्म्यातून प्रत्येक व्यक्ती स्वत:चे मत योग्य असल्याचे दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. हे विचार समोरच्या व्यक्तीला नाही पटले तर एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात. आत्मपरीक्षणाचा सणसणीत 'चाबुक' जर वेळीच ओढला गेला तर त्याचा नक्कीच फायदा होतो हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे'. हा 'चाबुक' कोण? आणि कशा रितीने ओढणार? याची वेगळी खासियत आहे. ती चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

'चाबुक' चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांना बेला शेंडे, ब्रिजेश शांडिल्य, विपिन पटवा यांचा स्वरसाज लाभला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news