

ठळक मुद्दे
विवेक अग्निहोत्री सध्या 'द बंगाल फाईल्स' चित्रपटाच्या रिलीजमुळे चर्चेत आहेत
रिलीजपूर्वी हा चित्रपट कायदेशीर वादात अडकला आहे
चित्रपटाविरोधात कोलकातामध्ये अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत
नवी दिल्ली - चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या द बंगाल फाईल्स या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी युएसए मध्ये आहेत. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाबद्दल माहिती दिलीय. त्यांनी सांगितले की, कोलकातामध्ये द बंगाल फाईल्स विरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहे. चित्रपटाला विरोध होत आहे. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपला संताप देखील व्यक्त केला आहे.
ते म्हणाले- 'आपल्या इतिहासात लपलेली, उजेडात न आलेली माहिती, अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहेत. तुम्ही माझ्या विरोधात आहात का, तुम्ही चित्रपटाच्या विरोधात आहात का? की तुम्ही सत्याच्या विरोधात आहात?' असा उद्विग्न सवाल त्यांनी व्हिडिओमध्ये विचारला आहे. शिवाय अग्निहोत्री यांनी राज्यात चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी न दिल्याने 'तृणमूल'वर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले, 'मी इथे आहे, तुम्हाला विश्वास बसणार ऩाही. पश्चिम बंगाल सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे सदस्य विविध शहरांमध्ये आमच्या विरोधात एफआयआर नोंदवत आहेत. ही त्यांची रणनीती आहे. मी गप्प होतो..ही माहिती कुणालाही सांगितली नाही. कारण आम्ही कायदेशीर मार्गाने जात होतो आणि आता चांगले वृत्त आहे की, कोलकाता उच्च न्यायालयाने एफआयआरला २६ ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे.'
एफआयआरमध्ये तक्रारदारांनी आरोप केलाय की, 'द बंगाल फाईल्स'च्या प्रदर्शनामुळे राज्यातील सलोखा बिघडू शकतो, विशेषतः विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. आता पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होईल.
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेक सामाजिक मुद्दे ते स्पष्टपणे मांडत असतात. पण अनेकदा त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते. 'द कश्मीर फाईल्स', 'द केरल स्टोरी' नंतर ते द बंगाल फाईल्स चित्रपट आणत आहेत. या बहुचर्चित चित्रपटावा कोलकातामध्ये विरोध केला जात आहे. विवेक अग्निहोत्री यांनी तेथील सरकारला उत्तर दिले असून त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर कोलकातामध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय.
विवेक अग्निहोत्री सध्या ‘द बंगाल फाईल्स’च्या प्रमोशनसाठी अमेरिकेत आहेत. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. विविध शहरांमध्ये अनेक वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात येत आहे.