पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमार (Ajith Kumar) एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. आगामी दुबई २४ तासांच्या शर्यतीच्या (Dubai 24 Hours race) सरावादरम्यान त्याच्या कारला अपघात झाला. दक्षिणात्य अभिनेता अजित कुमार दुबई 24H रेसिंग इव्हेंटसाठी सराव करत आहे. पण ७ फेब्रुवारी रोजी अजितच्या कारला सराव सत्रादरम्यान भीषण अपघात झाला. पण तो यातून सुदैवाने बचावला. या कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित कुमारच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती.
५३ वर्षीय अजित कुमार याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याची रेसिंग टीम अजित कुमार रेसिंग लाँच केली होती. तो टीममधील मॅथ्यू डेट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओड यांच्यासमवेत या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही रेस ११ आणि १२ जानेवारीला होणार आहे. अजित कुमार रेसिंग (Ajith Kumar Racing) या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर या अपघाताच्या थराराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शॉर्ट क्लिपमध्ये अजितची कार भारधाव वेगाने अडथळ्यांना (बॅरियर्स) जोरदार धडकताना दिसते. पुढच्या शॉटमध्ये तो कारमधून बाहेर पडताना दिसतो. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. या घटनेत त्याच्या कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला आहे.
"अजित कुमारची कार सरावादरम्यान धडकली. तरीही तो बिनधास्तपणे निघून गेला. ऑफिसमधला आणखी एक दिवस… हीच रेस आहे!" अशी कॅप्शन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
दुबई ऑटोड्रोम येथे दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या रेसिंग इव्हेंटमध्ये हाय परफॉर्मन्स जीटी आणि टूरिंग कार्स 24Hच्या फॉरमॅटच्या अवघड स्पर्धेत सहभागी होतात. जेथे वेग, रणनिती आणि क्षमतेचा कस लागतो.
या घटनेबाबत अजितचे व्यवस्थापक सुरेश चंद्र म्हणाले की, टीममधील सर्व ड्रायव्हर्स प्रत्येकी चार तासांच्या लाँग ड्रायव्हिंग सत्राचा सराव करत होते. त्याच्या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात अजितला कमी दृश्यमानता वातावरणादरम्यान एक वळण लागले, ज्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि स्पिन-ऑफ क्रॅश झाला.
ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी त्याच्या कारचा वेग १८० किलोमीटर होता. कार अडथळ्याला धडकल्यानंतर सातवेळा फिरली. इतका भयानक अपघात होता.
"त्याच्या कारचे नुकसान झाले आहे. पण त्याला काहीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर लगेच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि तो कारमधून बाहेर पडला. त्याला जवळच्या ग्रिडवर नेण्यात आले. तेथे त्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. "तो सुदैवाने बचावला. कारण त्याच्या मागे कोणीही नव्हते. जर त्याच्या मागे कार असती तर काहीतरी भयानक घडले असते," असे चंद्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.