Tamannaah Bhatia | सिनेमातली सर्वात वेगळी भूमिका? तमन्नाचा ‘जयश्री’ अवतार पाहून फॅन्स थक्क!
तमन्ना भाटियाचा ‘जयश्री’ लुक पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मोठी धूम झाली आहे. व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातील तिची ही भूमिका अत्यंत वेगळी मानली जात असून फॅन्स तिच्या लूकवर थक्क झाले आहेत.
New look of tamannah bhatia from V Shantaram movie
अभिनेत्री तमन्ना भाटियाने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. येणाऱ्या व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात ‘जयश्री’ची भूमिका ती साकारणार असून, तिचा पहिला पोस्टर लुक प्रदर्शित होताच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. आता यातील ‘जयश्री’ ही अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखेची पहिली झलक दाखवण्यात आलीय.
ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत आहे. व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. तमन्नाचा हा लुक तिच्या पूर्वीच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. पारंपरिक नऊवारी साडी, क्लासिक ज्वेलरी, जुना फिल्मी ग्लॅमर पोस्टरमध्ये दिसत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया फिकट गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत पोस्टरमधून दिसते.
चित्रपटात ‘जयश्री’ (व्ही. शांताराम यांची पत्नी) यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून तमन्ना भूमिका साकारणार आहे. सहकलाकार ते विवाह, प्रेम, तणाव, तत्कालीन सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे.
तमन्ना भाटियाच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यपूर्ण शालीनता, नैसर्गिक चमक, नाजुकता आणि तिच्या डोळ्यांतील भावना या भूमिकेला जिवंत करतात. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, असे निर्मात्यांना वाटते. फॅन्सनी तमन्नाच्या या लूकवर खूप सारे रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. काहींनी तर तिला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्साही असल्याचे म्हटले आहे.
सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत
अभिजीत देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात याआधी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा लूक प्रदर्शित झाला होता. तो व्ही. शांताराम यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित आहे. राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. ‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.

