

पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम हँडलवर व्हायरल होत आहे. सुरेश धस यांचा विषय संपल्याचे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. शिवाय प्राजक्ताने सुरेश धस, देवेंद्र फडणवीस आणि रुपालीताई चाकणकर यांचे आभार देखील मानले आहेत.
''तुम्हा सर्वांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. संबंध महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानते. समाजातील सर्व स्तरांतून आम्हाला पाठिंबा मिळाला, समर्थन दिलं. आम्हाला बळ मिळाला...याबद्दल धन्यवाद. माननीय आमदार सुरेश धस यांचे आभार मानते. मोठ्या मनाने त्यांनी समस्त महिलांची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असे करून तुम्ही दाखवून दिलात की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे पाईक आहात.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेदेखील मनापासून आभार मानते. त्यांनी जातीनं लक्ष घातलं. अत्यंत संवेदनशीलपणे त्यांनी हा विषय पुढे नेला आणि मार्गी लावला. मनापासून धन्यवाद. राज्य महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी देखील यावर त्वरीत कारवाई केली. त्यांचेही खूप आभार.''
बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आमदार सुरेश धस नवनीत कावत यांना भेटायला गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली तसेच परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असे म्हणत परळी पॅटर्नचाही उल्लेख केला होता. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गदारोळ सुरू झाला. आमदार सुरेश धस यांनी धनजंय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. सुरेश धस म्हणाले होते, ''जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.'' यावेळी त्यांनी सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला होता.