

पुढारी ऑनलाईन डेस्क - आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने गदारोळ झाला आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीला आमदार धस गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेवर टीका केली होती. ही टीका करताना सुरेश धस यांनी काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नाव घेतली होती. त्यामध्ये प्राजक्ता माळीचेही नाव आहे. आता प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार असल्याचे वृत्ता समोर आले आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गदारोळ सुरू आहे. आमदार सुरेश धस यांनी धनजंय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला.
सुरेश धस म्हणाले, ''जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.'' यावेळी त्यांनी सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला.
बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आमदार सुरेश धस नवनीत कावत यांना भेटायला गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली तसेच परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असे म्हणत परळी पॅटर्नचाही उल्लेख केला होता.
प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार म्हटल्यानंतर धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''हा विषय कुठे नेऊच नका. एखाद्या महिलेचा अवमान होईल असं मी बोललो नाही. त्यांनी माझा बाईट पाहावा. मी त्यांना प्राजक्ताताई म्हणालो आहे. त्यांना काही वावगं वाटलं तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं...मी चुकीचं बोललो नाही. मी माझी बाजू मांडेल...''