

Rajesh Khanna Marriage: माजी अभिनेत्री अनिता अडवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अजब याचिका दाखल केली होती. या याचिकेत अनिता यांनी दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याला लग्न संबोधण्यात यावं अशी मागणी केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली असून या याचिकेला एक विलासी याचिका असे बिरूद देखील लावलं.
सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस एम एम सुंदरेश आणि प्रसन्ना बी वरले यांनी या याचिकेला किंमत द्यावी असे यात काही नाही असं निरीक्षण देखील नोंदवलं. त्यावेळी त्यांनी ही एक विलासी याचिका असल्याचं सांगितलं.
न्यायालयात गेलेल्या अडवणी यांनी, 'मी माझ्या सन्मानाची मागणी केली होती. माझी माझ्या याचिकेत एवढीच विनंती होती की या घोषणेमुळे मला माझा एक प्रकारची डिग्निटी मिळेल.'
उच्च न्यायालयाने अडवाणी यांची ही याचिका रद्द केली होती. त्यापूर्वी सत्र न्यायालयाने देखील २०१७ मध्ये ही याचिका रद्द केली होती. राजेश खन्ना यांचे २०१२ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती.
अनिता अडवाणी यांनी दावा केला होता की त्या राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक वर्षे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र २०१२ मध्ये खन्ना यांचे निधन झाल्यावर आशीर्वाद बंगल्यातून मला बाहेर काढण्यात आलं. मला डिम्पल कपाडिया आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्न, अक्षय कुमार यांनी घरातून बाहेर काढलं.
त्यानंतर २०१३ मध्ये अडवाणी यांनी या सर्वांविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराच्या कलमाखाली तक्रार दाखल केली होती. अनिता अडवणी यांनी काही चित्रपटात अभिनय केला आहे. यात साजिश, दासी या सारख्या चित्रपटांचा समावेश होता. त्यांनी मुंबईतील बांद्रा भागात तीन बेडरूमचा फ्लॅट आणि महिन्याला पोटगी देखील मागितली होती.
२०१५ मध्ये अडवणी यांची ही याचिका कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळत राजेश खन्ना आणि अडवाणी यांच्या नात्याला लग्न असं संबोधता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळं त्यांना कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत कोणताही दिलासा देता येणार नाही असं देखील नमुद केलं होतं.
अडवणी या राजेश खन्ना यांच्या कुटुंबासोबत राहात नव्हत्या त्यामुळं त्यांच्याविरूद्ध कोणतेही कायदेशीर कार्यवाही होऊ शकत नाही असा आदेश देखील दिला होता.