सुंदरी मालिका : पारंपरिक सामाजिक रुढींना धक्का; स्त्री करणार अंत्यसंस्कार

sundari tv serial
sundari tv serial

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे यासाठी अनेकांनी लढा दिला आणि त्याला बहुतांश प्रमाणात यशही आले आहे. पण नीट विचार करता, असं वाटत नाही का की 'समान हक्क' या शब्दांना अजूनही पूर्णपणे न्याय मिळालेला नाही? मान्य आहे की, स्त्रिला शिक्षणाचा हक्क आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत, मतदानाचा हक्क, वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार, कोणत्या वयात लग्न करावे हे ठरवण्याचा हक्क, मुलाला जन्म देणे किंवा न देणे या बाबतीत निर्णय घेण्याचा हक्क हे सगळं मान्य आहे… पण अजूनही एका गोष्टीत मात्र स्त्रीला अधिकार देण्यात आलेला नाही आणि तो अधिकार म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा हक्क.

स्त्रियांना अंत्यसंस्काराचा हक्क नाही, इतकंच नव्हे तर त्यांना अंत्यसंस्कार विधीला येण्याचीही मुभा नसते. गेल्या काही काळात प्रगतीशील शहरांत काही स्त्रियांनी हा हक्क बजावला होता. परंतु त्यावरही आक्षेप घेण्यात आला. समाज प्रगती करतोय. पण या विचारांमुळे त्याची प्रगती कुठे तरी थांबतेय. 'अंत्यसंस्काराचा हक्क स्त्री-पुरुष दोघांना हवा' या नाजूक विषयावर 'सन मराठी' या टेलिव्हिजन चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या 'सुंदरी' मालिकेतून लक्ष देण्यात आले आहे.

'सुंदरी' ही मालिका मुळातच समाजातील स्त्रीच्या सौंदर्याच्या रुढ कल्पनांवर ताशेरे ओढते. या मालिकेतील नायिका रुढार्थाने रंग रुप नसलेली असल्याने तिचा पती पत्नी म्हणून तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. परंतु मुळातच हुशार, कर्तबगार असलेली सुंदरी तिच्या दिसण्यावर मात करत स्वत:ची ओळख बनवते, या आशयावर ही मालिका आधारली आहे. या मालिकेतील पुढील भाग लक्षवेधी ठरणार आहेत कारण आगामी भागात सुंदरी तिच्या वडीलसमान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे धाडसी पाऊल उचलताना दिसणार आहे. गावागावात आजही जिथे मुलीला आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराचा हक्क नाही तिथे एखाद्या सुनेला हा हक्क मिळणे तर अशक्यच. परंतु, समाजाने आखून दिलेली ही सीमारेषा मात्र सुंदरी ओलांडणार आहे.

येत्या आठवड्यात 'सुंदरी' मालिकेत रात्री १० वाजता सन मराठीवर ही मालिका पाहता येणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news