

Sonu Nigam apology to Kannadigas : बंगळूरुमध्ये होणाऱ्या आपल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गायक सोनू निगमने 'पहलगाम' टिप्पणीबद्दल कन्नडिगांची बिनशर्त माफी मागितली आहे. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एका जुन्या वक्तव्यावरून कन्नड संघटना आक्रमक झाल्या होत्या. 'कर्नाटक रक्षण वेदिके' (KRV) या कन्नड समर्थक संघटनेने बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांकडे सोनू निगमच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी केली होती. यानंतर सोनू निगम यांनी व्हिडिओ पोस्ट करत कन्नडिगांची माफी मागितली आहे.
यापूर्वी सोनू निगम यांनी एका कॉन्सर्टदरम्यान कन्नड गाणे गाण्याच्या मागणीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटकात तीव्र नाराजी पसरली होती. एप्रिल २०२५ मध्ये बेंगळुरूच्या 'ईस्ट पॉइंट कॉलेज'मधील कार्यक्रमादरम्यान, एका रसिकाने त्यांना कन्नड भाषेत गाणे गाण्याची विनंती केली होती. त्यावर सोनू निगम यांनी, "मी गायलेली सर्वोत्कृष्ट गाणी कन्नडमध्ये आहेत; पण एका मुलाने ज्या उद्धटपणे 'कन्नड, कन्नड' असे धमकावल्याच्या सुरात विचारले, ते मला अजिबात आवडले नाही. पहलगाम हल्ल्यामागेही अशीच मानसिकता असते," असे म्हटले होते. या वक्तव्यामुळे कन्नडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती. प्रो-कन्नड संघटना 'कर्नाटक रक्षण वेदिका' (KRV) ने या विधानाचा तीव्र निषेध केला होता.
'कर्नाटक रक्षण वेदिके' (KRV) चे प्रदेश अध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांनी या वादावर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये म्हटलं होतं की, सोनू निगम यांनी कन्नडिगांचा अपमान केला असून त्यांच्या विधानामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. २४ ऑक्टोबर रोजी बंगळूरुमध्ये होणाऱ्या त्यांच्या मैफिलीला परवानगी देऊ नये, अन्यथा राज्यव्यापी तीव्र निदर्शने केली जातील, असा इशाराही संघटनेने दिला होता. "कन्नडिगांनी ती जखम अजून विसरलेली नाही," असे केआरव्हीने आपल्या पत्रात नमूद केले होते.
२४ ऑक्टोबर रोजी थनिसंद्र मेन रोडवरील 'भारतीय मॉल ऑफ बंगळूरू' येथे कार्यक्रम होणार आहे. यापूर्वी सोनू निगम यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या प्रिय कुटुंबीयांनो, माझ्याकडून नकळतपणे असे काही घडले असेल ज्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागिततो. कोणाच्याही भावना दुखाव्यावात अस मी माणूस नाही, विशेषतः माझ्या कर्नाटकच्या कुटुंबाच्या. गेल्या ३० वर्षांत तुम्ही मला भरभरून प्रेम आणि सन्मान दिला आहे. त्यामुळे छोट्याशा गैरसमजुतीमुळे आपल्या या नात्यात दुभंग किंवा कटुता यावी, असे मला अजिबात वाटत नाही." दरम्यान, सोनू निगम यांच्या या दिलगिरीनंतर बेंगळुरूमधील आगामी कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.