
Sitaare Zameen Par first day Box Office collection
मुंबई - आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी ११.७० कोटींची कमाई केली आहे. ही आकडेवारी त्याचे मागील फ्लॉप चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’च्या ओपनिंग डे कमाईशी साधारणत: जुळणारी आहे. मात्र, हा चित्रपट आमिरचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट ‘३ इडियट्स’च्या ओपनिंग डेच्या कमाईशी बरोबरी करू शकला नाही. थ्री-इडियट्सने पहिल्या दिवशी १२.९९ कोटींची कमाई केली होती.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमिर खानची नवी चित्रपट "सितारे जमीन पर" अखेर २० जून २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक "तारे जमीन पर"चा स्पिरिचुअल सिक्वेल मानला जात असून, त्याची कथा प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी आहे.
चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. ११.७ कोटी रुपयांचा जबरदस्त ओपनिंग डे कलेक्शन नोंदवण्यात आले आहे. सकारात्मक प्रतिक्रिया, माऊथ-ऑफ-वर्ड प्रचार आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. वीकेंड जवळ येत असताना, या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे १० नवोदित कलाकारांचे भव्य पदार्पण होत आहे. हे कलाकार म्हणजे – अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. या नव्या चेहऱ्यांनी चित्रपटाच्या उत्सवाला अधिकच रंगत आणली आहे.
चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी ११.५० कोटी रुपयांची कमाई हिंदी भाषेतील चित्रपटातून झाली आहे. तमिळ आणि तेलुगु व्हर्जनमधून उरलेली कमाई आहे. ‘लाल सिंग चड्ढा’च्या बाबतीतही हिंदीमध्ये ११.६ कोटींची कमाई झाली होती, उरलेली रक्कम डब आवृत्तीतून आली होती. आता शनिवारी-रविवारी हा चित्रपट किती कमाई करू शकेल, याकडे लक्ष लागलं आहे.