
मुंबई : "सरजमीं की सलामती से बढ़कर, विजय मेनन के लिए कुछ भी नहीं" - अशी भावनिक सुरुवात करत ‘सरजमीं’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कर्तव्य, ओळख आणि भावनिक संघर्षांनी भरलेल्या एका गुंतागुंतीच्या प्रवासाची ही कथा आहे.
२५ जुलै रोजी जीओ हॉट स्टारवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सरजमीं’मध्ये पृथ्वीराज सुकुमारन विजय मेनन या भूमिकेत आहेत.एक असा माणूस जो वडिलांच्या प्रेमात आणि सैनिकाच्या कर्तव्यात अडकलेला आहे. काजोल 'मेहर'च्या भूमिकेत आहे. एक आई जी आपल्या कुटुंबासाठी सगळ्याशी लढा देते, आणि इब्राहिम अली खान 'हरमन'च्या रूपात आहे. एक असा तरुण जो प्रेम, निष्ठा आणि सत्याच्या वळणावर उभा आहे.
हा चित्रपट कायोझे इराणी यांच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट असून, धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हीरू यश जोहर, करण जोहर, आदार पूनावाला आणि अपूर्वा मेहता यांनी याची निर्मिती केली आहे.
‘सरजमीं’ ही देशभक्तीला समर्पित एक सशक्त भावनिक कहाणी आहे. जिथे त्याग, तुटलेली निष्ठा आणि रक्ताच्या नात्यांपेक्षा मोठ्या कर्तव्यासमोरील निवडीची मानसिक झुंज उलगडते. या तिघांचं कुटुंब, जे भूतकाळातील रहस्यांमुळे तुटलं आहे, त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा संघर्ष यात दिसतो. चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जिओ हॉटस्टारवर उपलब्ध होणार आहे.
सरजमीं हा माझा पहिला चित्रपट असून, मला याचा खूप अभिमान आहे. ही कथा माझ्यासमोर हळूच आली आणि काहीच क्षणात ती एक गर्जना बनली. ही कथा प्रेम, ओळख आणि आपल्या जागेच्या शोधाबद्दल आहे. काजोल मॅम, पृथ्वीराज सर आणि इब्राहिमसोबत काम करणं स्वप्नासारखं होतं. त्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना जी संवेदनशीलता दिली, त्यानेच सगळा फरक पडला.
कायोझे इराणी, दिग्दर्शक
काजोल म्हणाली- माझी भूमिका भावनिकदृष्ट्या फार गुंतलेली आहे. या भूमिकेच्या अनेक स्तरांनी मला खूप काही दिलं. इब्राहिमने त्याची भूमिका प्रभावीपणे साकारली असून, त्याचे काम पाहून अभिमान वाटतो.
सरजमीनचं स्क्रिप्ट वाचताच मी ठरवलं की ही भूमिका मला करायचीच आहे. यातली गुंतागुंत, भावना आणि कर्तव्यावरील निष्ठा यामुळे ही भूमिका फार खोलवर जाऊन सादर करावी लागली. काजोलसारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि इब्राहिम हा एक उदयोन्मुख रत्न आहे.
पृथ्वीराज सुकुमारन, अभिनेते