
Kiran Mane on Nilesh Sable Sharad Upadhye Controversy
मुंबई - किरण माने यांची चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळेबद्दल एक फेसबूक पोस्ट लिहिलीय, जी व्हायरल होत आहे. सध्या राशीचक्रकार शरद उपाध्ये आणि निलेश साबळे यांच्यात शाब्दीक वाद सुरु आहेत. दोघे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहेत. दरम्यान, अभिनेते किरण माने यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून निलेश साबळेचे समर्थन केले आहे. किरण माने यांनी काय म्हटलंय पाहुया.
निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. ‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची??? तुकोबाराया सांगून गेले आहेत, "सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।। त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।" कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक... आणि म्हण, "ए चल्... हवा येऊ दे" खुप शुभेच्छा मित्रा.
- किरण माने.
किरण मानेंची ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय. या पोस्टसोबत त्यांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावरील आपला एक फोटो शेअर केला आहे.
ज्योतिष अभ्यासक, लोकप्रिय राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी चला हवा येऊ द्या या टीव्ही शोच्या सूत्रसंचालक निलेश साबळेवर खरमरीत टीका केली होती. एक फेसबूक पोस्ट लिहून त्यांनी शोच्या ठिकाणी कशी अपमानास्पद वागणूक मिळाली हे सांगितले होते. शिवाय निलेश साबळेंच्या वर्तणुकीबद्दलही टीका केली होती. त्यानंतर निलेश साबळेनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
चला हवा येऊ द्या या शोचं सूत्रसंचालन नीलेश साबळे यांनी केलं होतं. पण आता सूत्रसंचालकाच्या जागी तो दिसणार नाहीय. तयाच्या जागी टीव्ही अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचा आधार घेत उपाध्ये यांनी साबळेवर टीका केली होती.
'आदरणीय नीलेशजी साबळे,
''आपल्याला हवा येऊ द्याच्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली.वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगीतले होते.''
''नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात.इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते.माझा सारा दिवस फुकट गेला.एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती.दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट.गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते.''
''एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.''
यावर निलेश साबळेनेही सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला- ''दहा वर्षापूर्वी घटनेबाबात आता तुम्ही का सोशल मीडियावर पोस्ट करता आहात? हे मला कळत नाही. मी तुमच्याविषयी काही वाईट बोललो का? मी काही वाईट पोस्ट केली का? मी तुमच्या शेजारी राहतो का ? मी तुम्हाला ना त्रास देतो, तरीही दामग दहा वर्षानंतर तुम्ही म्हणता चला हवा येऊ द्याच्या सेटवर माझे पाच ते सहा तास वाया गेले. पण तुम्ही माझ्याविषयी काल पोस्ट केल्यानंतर मला काल दिवसभर शंभर दिडशे फोन आले. तुमच्यामुळे माझेही सहा तास वाया गेलेत आहेत.''