Ashadhi Ekadashi Special Marathi Movies | मराठी चित्रपटांवर विठ्ठलभक्तीचं गारुड!

Ashadhi Ekadashi 2025 | मराठी चित्रपटांवर विठ्ठलभक्तीचं गारुड!
Ashadhi Ekadashi 2025
Ashadhi Ekadashi special Marathi movies Instagram
Published on
Updated on
स्वप्निल कुलकर्णी

मुंबई : आजच्या गतिमान युगात माणूस बदलला, भक्तीची माध्यमे बदलली; पण श्रद्धा अढळ राहिली. हे सामर्थ्य या पंढरीच्या वाटेत आहे. विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला येतात. आषाढी वारीच्या या प्रवासाने, पंढरीच्या वाटेने मराठी चित्रपटसृष्टीवर असं काही गारुड निर्माण केलं की, अवघी मराठी चित्रपटसृष्टी विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघाली. मराठी चित्रपटात पंढरीची ही वाट अनेक वेळेस चित्रित केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हे विठ्ठलाचे दर्शन एक वेगळी प्रसन्नता देऊन जाते. त्यामुळे हे चित्रपट मनात घर करून राहतात. आषाढी वारीनिमित्त अशाच काही चित्रपटांचा घेतलेला हा मागोवा.

'संत तुकाराम' १९३६

१९३६ मध्ये आलेल्या प्रभातच्या 'संत तुकाराम' या चित्रपटाने उत्पन्नाचे रेकॉर्डच मोडले होते. विष्णूपंत गोविंद दामले आणि शेख फत्तेलाल यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. विष्णूपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका साकारली होती. एकाच चित्रपटगृहात एक वषपिक्षा जास्त काळ राहणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. 'आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा' हा अभंग सुरू होतो आणि चित्रपटात तुकाराम महाराजांच्या भक्तांचे डोळे पाणावतात, त्याचवेळी हा चित्रपट बघायला आलेले विठ्ठलभक्तही भावुक होत असत. प्रेक्षकांमधूनही 'पांडुरंग हरी, पांडुरंग' हरी हा जयघोष होत असे.

संत ज्ञानेश्वर १९४०

प्रभात फिल्मच्या १९४० मध्ये आलेल्या 'संत ज्ञानेश्वर' या चित्रपटालाही अमाप प्रसिद्धी मिळाली. शिवराम वाशिकर यांची कथा आणि दिग्दर्शक व्ही. दामले होते. शाहू मोडक, दत्ता धर्माधिकारी यांच्या अभिनयाने संपन्न याही चित्रपटाला पाहून प्रेक्षक भावुक व्हायचे. रेड्याच्या तोंडातून वेद पठणाचे दृश्य पाहून अनेकजण अचंबित व्हायचे. चांगदेवाचे आगमन, वाघावर त्यांची स्वारी आणि चांगदेवाला भेटायला जाण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तो क्षण या चित्रपटाचा क्लायमॅक्स ठरला. 'एक तत्त्व नाम दृढ धरी मना' या बाल ज्ञानेश्वरांच्या मुखी असलेल्या अभंगाने खूप प्रसिद्धी मिळवली.

पंढरीची वारी १९८८

आषाढी वारीवरील चित्रपटांमध्ये 'पंढरीची वारी' या चित्रपटाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. रमाकांत कवठेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र, सिनेमाचे निमति आण्णासाहेब घाटगे यांची अनेकदा परीक्षा घेतली, अनेक अडथळे आले, पण त्यांनी हा सिनेमा बनवला. या चित्रपटातील गाणीही छान जमून आली आहेत. 'धरीला पंढरीचा चोर...' हे गाणं तर आजही आवडीने ऐकलं जातं. सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम जमून आल्या आहेत. दूरदर्शनचा काळ होता, तेव्हा आषाढी एकादशी दिवशी टीव्हीवर हा चित्रपट दाखवला जात असे.

Ashadhi Ekadashi 2025
Sarzameen Trailer | कर्तव्य आणि नात्यांमधील संघर्षाची गोष्ट – ‘सरजमीन’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

मी वारीवर 'पंढरीची वारी', 'राजा पंढरीचा', 'माहेर माझे पंढरपूर' असे तीन चित्रपट केले. पण यापैकी पंढरीची वारी चित्रपटाला लोकप्रियता मिळाली. त्याला संगीत अकादमीचा पुरस्कारही मिळाला. सुरुवातीला या चित्रपटात अरुण सरनाईक, अभिनेत्री रंजना, गोविंद कुलकर्णी यांना घेण्यात आले होते. मात्र शूटिंगदरम्यान अरुण सरनाईक यांचे अपघाती निधन झाले. रंजनाचाही अपघात झाला. श्रीकांत मोघे, डॉ. श्रीराम लागू, रवींद्र महाजनी या अभिनेत्यांनी नकार दिल्यामुळे मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा झाली आणि ती भूमिका माझ्या वाट्याला आली. चित्रपटातील गाणी अप्रतिम होती. वारीचा अनुभव जीवन समृद्ध करणारा होता. आम्हीही काही काळ वारीत चाललो. वारकरी हे विठुरायाच्या नामात दंग झालेले असतात. त्यांच्या भक्तीला खरंच तोड नाही. चित्रीकरणादरम्यान आम्हाला कसलाही त्रास झाला नाही.

- बाळ धुरी, अभिनेते

विठ्ठल विठ्ठल २००३

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'विठ्ठल विठ्ठल' चित्रपटामध्ये मिलिंद गवळी, वृंदा गजेंद्र, मिताली जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात चार भिन्न पात्रे उलगडली आहेत, जी त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या हेतूने वारीमध्ये सामील होतात. प्रत्येकाची कारणे वेगळी असून त्यांचा अनोखा प्रवास या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनाचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले होते.

Ashadhi Ekadashi 2025
Lakshmi Niwas | जयंत- जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री; लहानाबाळा सारखं जपाव लागतं त्याला

हरी ओम विठ्ठला  २००८

'हरी ओम विठ्ठला' या भक्तीपटाचे दिग्दर्शन साद दळवी यांनी केले होते. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, जयंत सावरकर, अमिता खोपकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट विठ्ठलभक्त गन्याच्या जीवनावर आधारित आहे. गन्या जेव्हा संकटांमध्ये अडकतो, तेव्हा तो देवाकडे उपाय विचारतो. जेव्हा तो हे सर्व लोकांना सांगतो की, मला देवाने दर्शन दिले, तेव्हा त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. या सर्व गोष्टी सहन न झाल्याने तो मुंबईला जातो आणि एका गायन स्पर्धेत लाखो रुपये जिंकतो आणि तो गावी परततो.

माझ्या स्वप्नात डोक्यावर तुळस घेऊन पायी वारी करणारी वारकरी महिला दिसली, तेव्हा वारीवर चित्रपट करायचे ठरविले. तेव्हा वारीला २१ दिवस शिल्लक होते. मी पटकथा लिहिली. पालवीच्या प्रस्थानावेळी जाऊन आम्ही शूटिंग केले. जेव्हा पुण्यातून वारी निघते, तो दिवे घाट, सासवड प्रवास शूट केला. मुंबईला परत आल्यावर सगळं चित्रीकरण तपासले. आत्मविश्वास वाढल्यामुळे सगळे युनिट घेऊन नातेपुते येथे वारीला जॉईन झालो. नातेपुतेपासून वारीत शूटिंग केले. सदाशिवनगर, वारवरी येथील रिंगण सोहळा अप्रतिम झाला. हा पायी वारी करत केलेला चित्रपट आहे. चित्रपटातील गाणी अप्रतिम झाली. मधल्या दहा दिवसांत गाणी रेकॉर्ड केली. चित्रपट उत्तम चालला. अनेक पुरस्कार मिळाले. आजही एकादशीला तो चित्रपट कुठं कुठं तरी लागतोच. त्यावेळी घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे असे वाटते.

गजेंद्र अहिरे, दिग्दर्शक

गजर २०११

'गजर' हा एक अनोखा चित्रपट अनुभव आहे. पार्थच्या १८ दिवसांच्या तीर्थयात्रेदरम्यान (वारी) स्वतःला शोधण्याची आणि परिवर्तनाची कहाणी आहे. देव माऊलीच्या नावाने वारकऱ्यांचा अखंड नामजप आणि संगीत्तमय उत्सव म्हणजे 'गजर', टॉप अँगल, साईड अँगल आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अचूकपणे टिपण्यासाठी खास फ्रेम्सचा वापर करण्यात आला होता. यासाठी हॉलीवूडच्या काही तंत्रज्ञांना बोलाविण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटिंग हे खऱ्या वारीमध्येच करण्यात आलेले आहे.

एलिझाबेथ एकादशी २०१४

'एलिझाबेथ एकादशी' म्हणजे नेमके काय? ज्ञानेश आणि झेंडू या बहीण-भावाची गोष्ट. आईचे शिलाई मशिन बँकेने जप्त केलेले असते. ते सोडवण्यासाठी पैसे जमवताना केलेल्या प्रयत्नांची भावपूर्ण कथा. त्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीचे रूप. मधुगंधा कुलकर्णी यांची ही साधी, सोप्पी गोष्ट मनात घर करते. या चित्रपटात आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेले गाणं अप्रतिम आहे. छोट्या बालकलाकारांच्या आवाजात ते गाण्यात आले आहे. बाकी चित्रपटात टाळ-चिपळ्यांचा आवाज अत्यंत प्रभावीपणे वापरण्यात आला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाची पूर्ण कथा पंढरपूरमध्ये आणि आषाढी एकादशीच्या वातावरणात घडते.

लय भारी, माऊली २०१४/२०१८

रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटाने विठ्ठल भक्तीचे नव रूप समोर आणले. दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या या चित्रपटाचे संवाद खूपच भारी ठरले. अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. या चित्रपटाचाच पुढचा भाग ठरलेल्या 'माऊली' चित्रपटातही विठ्ठलभक्तीचे एक रूप पाहायला मिळाले. आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातलेही संवाद प्रेक्षाकांच्या पसंतीस आले. वारकरी आणि 'वार'करी मधला फरक अधोरेखित करणारा हा सिनेमा मराठी व्यावसायिक सिनेमाला नवं वळण देणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news