

'अल्याड-पल्याड' या चित्रपटाने आपल्या गूढ आणि थरारक कथेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यातील सर्वात लोकप्रिय ठरलेली व्यक्तिरेखा म्हणजे अभिनेता संदीप पाठक यांनी साकारलेला ‘दिल्या’. आता याच 'दिल्या'चा नवा आणि अधिक भयानक प्रवास प्रेक्षकांना ‘घबाडकुंड’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
‘दिल्या’चा नवा अवतार आणि गूढ रहस्य
चाकोरीबाहेरील भूमिकांसाठी ओळखला जाणारा संदीप पाठक आता ‘घबाडकुंड’ युनिव्हर्समध्ये एका वेगळ्याच आव्हानाचा सामना करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये संदीप पाठक सोन्याच्या मोहात चक्क एका खोल आणि गूढ विहिरीत उतरल्याचे पाहायला मिळते. पण हे सोनं साधं-सुधं नसून त्यामागं काहीतरी भयानक रहस्य दडलं आहे, याची जाणीव टीझर पाहताना होते. भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी स्थायिक झालेला 'दिल्या' आता कोणत्या नव्या संकटात सापडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
विहिरीत उतरण्याचा चित्तथरारक अनुभव
या भूमिकेबद्दल आणि विहिरीत उतरण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना संदीप पाठक सांगतात की, "घबाडकुंड मध्ये दिल्या साकारणं हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. ‘अल्याड-पल्याड’ मधील दिल्यापेक्षा हा नवा दिल्या पूर्णपणे वेगळा आहे. विहिरीत उतरण्याचा सीन करताना खरोखरच अंगावर काटा आला होता. तो केवळ सोन्याचा शोध नव्हता, तर प्रत्येक पावलावर अंधार आणि अनोळखी शक्तींशी दिलेला लढा होता. त्या प्रत्येक शॉटमध्ये भीती आणि वास्तव याचा तोल सांभाळताना माझी कसोटी लागली."
मराठीतील महत्त्वाकांक्षी ‘युनिव्हर्स’
दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी मराठीत कल्पनेच्या पलीकडचे एक ‘युनिव्हर्स’ साकारण्याचे धाडस केले आहे. 'आयकॉन दी स्टाईल' संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची या चित्रपटाला साथ लाभली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारे पात्रांचे युनिव्हर्स तयार होणे, ही प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरणार आहे. टीझरमधील सिनेमॅटोग्राफी आणि संदीप पाठक यांचा अभिनय पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार यात शंका नाही.
‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संदीप पाठक यांचा हा नवा अवतार आणि विहिरीतील ते गूढ रहस्य काय आहे, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.