शाहीर साबळे यांच्यावर चरित्रपट, शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत सना केदार शिंदे!

शाहीर साबळे यांच्या पत्नीच्या भूमिकेत सना केदार शिंदे!
शाहीर साबळे यांच्या पत्नीच्या भूमिकेत सना केदार शिंदे!

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जय जय महाराष्ट्र माझा…' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झाले आहे. त्यांचा नातू केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व असा योग जुळून आला आहे. नातवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका कोण करत आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. तर ही भूमिका करतेय शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे!

'महाराष्ट्राचे शाहीर' अशी ज्यांची ख्याती होती त्या शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान साजरे होत आहे. शाहिरांच्या जीवनावरील चरित्रपट 'महाराष्ट्र शाहीर' एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होत आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा…' या महाराष्ट्र गीतासह 'महाराष्ट्र भूमी बहुगुणी…शोभते खणी, किती नरमणी…', 'या गो दांड्यावरून….', 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या….' अशी दर्जेदार लोकगीते देणाऱ्या या शाहिरांची भूमिका आघाडीचा नायक अंकुश चौधरी करत आहे.

शाहिरांच्या यशामध्ये त्यांची पत्नी भानुमती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गायलेली अनेक लोकगीते भानुमती यांनी लिहिली होती. त्यांचीच महत्त्वाची भूमिका सना केदार शिंदे करत आहे. 'महाराष्ट्र शाहीर'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हेनिर्माते आहेत. अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे.

लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेलेल्या कृष्णराव अर्थात शाहीर साबळे यांनी १९४२ची चले जाव, स्वातंत्र्यानंतरचा गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळींमध्ये सहभाग घेतला होता. लोककलेच्या क्षेत्रातील मोलाच्या योगदानबद्दल या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता.

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news