

Samay Raina Koffee With Karan 9: कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण ९’. समयने नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या शोचे पोस्टर शेअर केले. त्यानंतर तो या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, समयच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मात्र, समयने पोस्टर शेअर करताना कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच शोच्या निर्मात्यांकडूनही त्याच्या सहभागाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
समय रैना ‘कॉफी विथ करण ९’मध्ये आपली कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मेधा शंकर हिच्यासोबत सहभागी होऊ शकतो. मात्र, समय आणि मेधा यांच्यातील नात्याबाबत किंवा शोमधील त्यांच्या सहभागाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना या एपिसोडची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, समय रैना शोमध्ये येणार असल्याची चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये. याआधी करण जोहरने ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ‘कॉफी विथ करण ९’मधील पाहुण्यांबद्दल काही माहिती दिली होती.
या मुलाखतीत करणने समय रैना, कॉमेडियन तन्मय भट्ट आणि फराह खान यांच्यासोबत एक खास एपिसोड केल्याचे सांगितले होते. या तिघांसोबतचा एपिसोड खूपच मजेदार असेल, असेही त्याने म्हटले होते.
करण जोहरने सांगितले होते की, या सीझनमध्ये पाहुण्यांची निवड करताना त्याने त्यांच्यासोबतचे वैयक्तिक संबंध आणि मैत्री लक्षात घेतली. ज्या लोकांसोबत तो सहजपणे संवाद साधू शकतो, अशा पाहुण्यांना शोमध्ये बोलावण्याचा त्याचा प्रयत्न होता.
प्रत्येक एपिसोडसाठी दोन पाहुण्यांची निवड करणे सोपे नव्हते. त्यामुळे यावेळी काही सेलिब्रिटी जोड्यांनाही एकत्र आमंत्रित करण्यात आले आहे.
समय रैना, तन्मय भट्ट आणि फराह खान यांच्या एपिसोडबद्दल बोलताना करण म्हणाला होता की, हे तिघे मिळून त्याची चांगलीच मजा घेणार आहेत. त्यामुळे हा एपिसोड प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला होता.