

दिलीप कुमार आणि सायराबानो ही बॉलीवूडमधील एवरग्रीन जोडी. अलीकडेच या जोडीच्या लग्नाचा 59 वा वाढदिवस झाला. दिलीप कुमार आता हयात नाही. पण सायरा यांनी लग्नातील काही फोटो शेयर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या लग्नातील अनसीन फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Latest Entertainment News)
यासोबत आठवणी शेयर करणारे कॅप्शनही लिहिले आहे. त्या या कॅप्शनमध्ये लिहितात, माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय संध्याकाळच्या, आमच्या लग्नाच्या रात्रीच्या, ५९ वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये मी रमून जाते. दो सितारों का ज़मीं पर है मिलन आज की रात” हे गाणं एका आशिर्वादासारखे आसपास जाणवत होते. मला आठवतंय, हे गाणे रात्रभर वाजत होते. मला त्या संध्याकाळी कोणी हे सांगितले असते की मी खरोखर उडू शकते, तर माझा विश्वास बसला असता. इतकं ते सगळं अविश्वसनीय, स्वप्नवत वाटत होतं
त्यादिवशी कोणताही महागडा डामडौल नव्हता. माझ्या लग्नाचा पोशाख एका स्थानिक शिंप्याने शिवला होता. कोणतेही भव्य डिझायनर नव्हते, मोठे प्लानर नव्हते. खरे तर लग्न नोव्हेंबरमध्ये होणार होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. आजही मला फोनवर ऐकलेला साहेबांचा कोमल पण कणखर आवाज आठवतो. ते म्हणाले, ‘तुम्ही एका मौलवीला बोलावून घ्या आणि निकाह करून द्या.’ अगदी पापणी लवेपर्यंत माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आला.’
अर्थात या लग्नात एक सुखद गोंधळ माजला होता. साहाब आणि मी जवळच रहात होतो. त्यांची वरात गल्लीतून खाली आली तेव्हा छत्री त्यांच्या चेहऱ्याला धडकली. मला अजूनही तो क्षण आठवला की मला हसू येते. दिलीप कुमारचे लग्न होते आहे अशी बातमी पसरली आणि फॅन्सनी आमच्या घराभोवती गर्दी केली. घर गर्दी, हसू आणि अनोळखी चेहऱ्यांनी भरून गेले होते.
पुढे सायरा म्हणतात की, निकाहसाठी मला वरच्या मजल्यावरून खाली यायला दोन तास लागले. नवरी तिच्या पाहुण्यांच्या गर्दीमुळेच लवकर खाली येऊ शकली नाही.
गर्दी इतकी जास्त होते की जेवण कमी पडले. लोक या लग्नाच्या आठवणी म्हणून काटे-चमचे खिशात टाकायला लागले, जणू काही ते एका परीकथेतील वस्तू गोळा करत होते. कसा दिवस होता तो. अनपेक्षित, अपरिपूर्ण तरीही अवर्णनीय आनंदाने भरलेला होता. ती आजही माझ्या हृदयात आजही कोरली गेली आहे.
सायराबानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात जवळपास 22 वर्षांचे अंतर होते. सायरा या वयाच्या 12 वर्षापासून दिलीप यांच्या प्रेमात होत्या.