

Chal Bhava Cityt fame Revathi Iyer Debut Film
मुंबई - रिॲलिटी शो “चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेत्री रेवथी अय्यरने सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये रेवथी लाईमलाइटमध्ये दिसत आहे. तसेच तीने घेतलेल्या मेहनतीमुळे ती महाअंतिम सोहळ्यात देखील पोहोचली आहे. ती आता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिची मुख्य भुमिका असणारा ‘पायवाटाची सावली’ हा चित्रपट ३० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि माणसाच्या भावनिक संघर्षाचा वेध घेणारा ‘पायवाटाची सावली’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मुन्नावर शमीम भगत यांचे आहे. निर्मिती 'मीना शमीम फिल्म्स'ची आहे. संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केले आहे. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत. तर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आणि सिंडीकेशनचे काम केले आहे.
अभिनेत्री रेवथी अय्यर म्हणाली, “प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते मुन्नावर शमीम भगत सरांनी जेव्हा मला या चित्रपटाविषयी विचारलं तेव्हा मला फार आनंद झाला होता. मी या आधी काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. चित्रपटात काम करण्याची माझी खूप आधीपासून इच्छा होती. ही इच्छा एतक्या लवकर पूर्ण होईल, असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मी लगेच या चित्रपटासाठी माझा होकार कळवला. पहिलाच चित्रपट शिवाय प्रमुख भूमिका मिळाली. त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण हे कोल्हापुरातील एका गावात शूट झालं आहे. या चित्रपटामुळे मी खूप नव्या गोष्टी शिकले. मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी मुन्नावर सर यांचे मनापासून आभार मानते.”