

अभिनेता रवी मोहन आणि पत्नी आरती रवी यांच्या घटस्फोट प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिल्याचे वृत्त समोर आले आहे. आरती रवी यांनी दरमहा ४० लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून दरमहा ३ लाख रुपये अंतरिम पोटगी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता रवी मोहन आणि त्यांची पत्नी आरती रवी यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आरती यांनी अंतरिम पोटगी म्हणून दरमहा ४० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी मान्य न करता रवी मोहन यांनी खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत आरती आणि त्यांच्या मुलांच्या खर्चासाठी दरमहा ३ लाख रुपये द्यावेत, असे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी, पोटगीच्या अर्जावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला विलंब होत असल्याचा आरोप करत आरती यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाला या अर्जावर तातडीने सुनावणी घेऊन निश्चित मुदतीत निर्णय देण्याचे आदेश दिले होते.
आपल्याकडे नियमित उत्पन्नाचे कोणतेही सक्षम साधन नसल्याने मुलांचे शिक्षण, राहणीमान आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आरती यांनी न्यायालयासमोर मांडले होते. त्यामुळे त्यांनी दरमहा ४० लाख रुपयांच्या अंतरिम पोटगीची मागणी केली होती.
मात्र, न्यायालयाने मागितलेली रक्कम परिस्थितीच्या तुलनेत जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवत ती फेटाळली. त्याऐवजी, घटस्फोटाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरमहा ३ लाख रुपये अंतरिम पोटगी म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला.
रवी मोहन आणि आरती रवी यांनी दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर २००९ साली विवाह केला होता. तब्बल १५ वर्षांचा संसार केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या घटस्फोटाशी संबंधित खटल्याची सुनावणी चेन्नईतील कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे.
या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून न्यायालयासमोर सविस्तर बाजू मांडली जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. अलीकडेच देण्यात आलेला अंतरिम पोटगीचा आदेश हा केवळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना लागू राहणारा तात्पुरता निर्णय आहे. दुसरीकडे, रवी मोहन त्याच्या अनेक आगामी चित्रपटांच्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याचे सांगितले जात आहे.