

Rashmika Mandanna
हैदराबाद: अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. नुकतीच तिने अभिनेता विजय देवरकोंडासोबत गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा होती. आता रश्मिकाने तिच्या भविष्यातील मुलांबद्दल आणि त्यांच्यासाठी असलेल्या संरक्षणात्मक भावनांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत रश्मिका मंदानाने आई बनण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, "मी अजून आई झालेली नाही, पण मला आत्तापासूनच असे वाटते आहे. मला माहित आहे की मला मुले होतील, आणि मला हे खूप आवडते की हे लवकरच होणार आहे. जी मुलं अजून जन्मालाही आली नाहीत, त्यांच्यासाठी मला आत्तापासूनच खूप ओढ आणि प्रेम जाणवत आहे."
ती पुढे म्हणाली, "मला त्यांच्यासाठी सर्व काही करायचे आहे. मला त्यांना खूप जपायच आहे. जर मला त्यांच्यासाठी युद्धात जावे लागले, तर मी त्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट असायला हवे. मी आत्तापासूनच त्याबद्दल विचार करत आहे."
रश्मिकाने तिच्या जीवनातील कामाच्या आणि खासगी आयुष्याच्या संतुलनाबद्दलही सांगितले. "माझ्या मनात नेहमी होते की २० ते ३० वर्षांचे वय हे काम करण्याचे आहे, कारण समाजाने आपल्या मनात हेच बिंबवले आहे. आपल्याला आपले उत्पन्न कमवायचे आहे, आपला पैसा कमवायचा आहे. मला माहित होते की ३० ते ४० वर्षांचे वय नेहमीच काम आणि खासगी आयुष्याच्या संतुलनाबद्दल असेल. आणि हे मला नक्कीच करायचे आहे. ४० नंतरचा विचार मी अजून इतका केलेला नाही." तिच्या मते, प्रत्येक गोष्टीसाठी तिने एक निश्चित वेळ ठरवून ठेवला आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या जोड्यांपैकी एक आहेत. त्यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत, मात्र दोघांनीही कधीही याची अधिकृत पुष्टी केली नाही. नुकतीच बातमी आली होती की या महिन्याच्या सुरुवातीला दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. रश्मिकाच्या एका व्हिडिओमध्ये तिच्या चाहत्यांनी तिची साखरपुड्याची अंगठी पाहिली होती. आता, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये रश्मिका आणि विजय विवाहबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.