

Kantara mimicry row
बंगळूरु : अभिनेता रणवीर सिंग याच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल झालेला गुन्ह (FIR) रद्द करण्याची याचिका निकाली काढण्याचे संकेत कर्नाटक उच्च न्यायालयाने आज (दि.२५) दिले. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांच्या खंडपीठाने सांगितले की, माफीनाम्याबाबत मांडण्यात आलेल्या आक्षेपांचा विचार करून न्यायालय ही याचिका निकाली काढेल.
गेल्या वर्षी गोव्यात पार पडलेल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' (IFFI) दरम्यान दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आराध्य दैवत 'चावुंडा दैव' यांचा अपमान केल्याच्या आरोपावरून रणवीरविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर रणवीरने माफीनामा सादर करत एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदाराची बाजू मांडणारे वकील प्रशांत मेथल यांनी न्यायालयाला विनंती केली की, सेलिब्रिटींना अशा कमेंट्स करण्यापासून रोखण्यासाठी आदेशात कडक शब्दांत ताकीद देण्यात यावी. ते म्हणाले, "त्यांच्यासाठी ही केवळ एक केस आहे, पण आमच्यासाठी ही श्रद्धा आहे. प्रत्येक शब्दाला वजन असते. इतर सेलिब्रिटींनी हे गृहीत धरु नये, म्हणून न्यायालयाने कठोर इशारा द्यावा." यावर न्यायमूर्ती नागप्रसन्न यांनी नमूद केले की, अभिनेत्याचे वर्तन समज देण्यासारखेच आहे आणि खटला निकाली काढताना ते तसे करतील.
रणवीरच्या वकिलांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आपल्या वक्तव्याबद्दल अभिनेत्याला पश्चात्ताप असून माफीचा भाग म्हणून तो चामुंडी हिल मंदिराला भेट देऊन दर्शन घेईल. शनिवारी झालेल्या युक्तिवादाचा मुख्य केंद्रबिंदू रणवीरने सादर केलेले प्रतिज्ञापत्र होते. यामध्ये त्याने म्हटले होते की, तो 'योग्य वेळी' मंदिराला भेट देईल. वेळापत्रक आणि सुरक्षेच्या कारणांमुळे निश्चित तारीख देणे कठीण असल्याचे त्याने नमूद केले होते.
तक्रारदारांनी 'योग्य वेळी' या शब्दावर आक्षेप घेत याला संदिग्ध म्हटले आणि कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी केली. मेथल यांनी युक्तिवाद केला की, कर्नाटक पोलीस कोणत्याही सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यास सक्षम आहेत. न्यायमूर्ती नागप्रसन्न यांनी अभिनेत्याला कालमर्यादा देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, "खटला निकाली काढताना मी नोंद करेन की, त्याने पुढील चार आठवड्यांत मंदिराला भेट द्यावी."
गेल्या वर्षी गोव्यातील ५५ व्या इफ्फी (IFFI) समारंभाच्या सांगता सोहळ्यात रणवीर सिंगने 'कांतारा चॅप्टर १' मधील 'चावुंडा दैव' च्या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टीचे कौतुक केले होते. यावेळी दैवाचा उल्लेख 'भूत' असा करत त्याने चित्रपटातील ऋषभच्या अभिनयाची (ओरडण्याची) नक्कल केली होती. या कृत्यावर सोशल मीडियावर तीव्र टीका झाली आणि अनेकांनी याला असंवेदनशील म्हटले. यानंतर बंगळुरूच्या एका वकिलाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. या तक्रारीच्या आधारे रणवीरविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.