

Rajpal Yadav bail rejected
नवी दिल्ली : अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि. १२) मोठा झटका दिला. आर्थिक व्यवहाराबाबत दिलेले आश्वासन पाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्यायालयाने यादव न्यायालयाने फटकारले. यासोबतच, न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) पुढे ढकलल्यामुळे राजपाल यादवला किमान आणखी चार रात्री तिहार कारागृहातच काढाव्या लागणार आहेत.
राजपाल यादवने २०१० मध्ये 'अता पता लापता' या आपल्या चित्रपटासाठी 'मुरली प्रोजेक्ट्स' कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह ही रक्कम आता साधारण ९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही रक्कम न परत केल्याचा आरोप राजपाल यादववर आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५ फेब्रुवारीपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, यादव सध्या तुरुंगात आहे ते न्यायालयाच्या आदेशामुळे नसून त्याच्या स्वतःच्या वागणुकीमुळे आहे. "जेव्हा तुम्ही स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे, तेव्हा शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे निरीक्षण न्यायमूर्ती शर्मा यांनी नोंदवले.
राजपाल यादवने किमान दोन डझन वेळा न्यायालयात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. आपल्या पुतणीच्या लग्नासाठी राजपालने जामीन मागितला होता, मात्र त्याच्या वकिलांनी पेमेंटबाबत सूचना घेण्यासाठी वेळ मागितल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली. आता या प्रकरणी सोमवारी (१६ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.
दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर आणि राजपाल यादवची परिस्थिती पाहून बॉलीवूडमधील काही कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आता सोमवारच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.