

बिहार विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. त्याचे रूपांतर एका मोठ्या कौटुंबिक फुटीत झाले आहे. लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनी शनिवारी (दि. 15) स्फोटक आरोप करत कुटुंबाशी सर्व संबंध तोडत असल्याची नाट्यमय घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच, रविवारी (दि. 16) लालूंच्या आणखी तीन मुली राजलक्ष्मी, रागिणी आणि चंदा यांनीही आपल्या मुलांसह पाटणा येथील निवासस्थान सोडल्याचे समोर आले आहे. त्या सर्व दिल्लीला रवाना झाल्या आहेत. या प्रकारामुळे बिहारच्या सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंबातील हा दुभंग दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्या संतापाच्या उद्रेकामुळेच सुरू झालेला हा संघर्ष आता कुटुंबातील एक मोठा वाद बनला आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बहिण रोहिणी आचार्य यांनी केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतरच्या कौटुंबिक उलथापालथीचा थेट परिणाम पक्षाच्या अंतर्गत कामकाजावर आणि विशेषतः तरुण नेतृत्व सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
RJD च्या निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर अवघ्या काही तासांतच, सिंगापूरस्थित डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबाला सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला. भावनात्मक पोस्ट्सच्या मालिकेत, रोहिणी यांनी आरोप केला की त्यांना 'गलिच्छ शिवीगाळ' करण्यात आली आणि तेजस्वी यादव यांचे जवळचे दोन सहकारी राज्यसभा खासदार संजय यादव आणि त्यांचे जुने सहयोगी रमीझ यांच्याशी झालेल्या वादामध्ये त्यांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
रोहिणी यांनी म्हटले की, ‘मला माझ्या कुटुंबापासून दूर केले गेले. वडिल लालू यादव यांना किडनी दान केल्याबद्दल माझ्यावर कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप झाला. हे अत्यंत अपमानजनक होते.’
दरम्यान, संजय यादव आणि रमीझ यांनी रोहिणी यांच्या आरोपावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. ज्यामुळे तेजस्वी यांच्याभोवती असलेल्या अंतर्गत सत्ता संघर्षाच्या चर्चांना जोर आला आहे.
या गंभीर पार्श्वभूमीवर, रोहिणी यांचे समर्थन करत, राजलक्ष्मी, रागिणी आणि चंदा या रविवारी सकाळी 10 सर्क्युलर रोडवरील लालू आणि राबडी देवी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या. सूत्रांनुसार, गेल्या दोन दिवसांतील घटनांमुळे त्या अत्यंत त्रस्त असल्याचे समजते.
या तिघींच्या जाण्याने, एकेकाळी गजबजलेले RJD चे राजकीय केंद्रस्थान आता फक्त लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांच्या उपस्थितीत शांत झाले आहे.
रोहिणी यांच्या आरोपांमुळे त्यांचे मोठे बंधू तेज प्रताप यादव यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या जनशक्ती जनता दलच्या (JJD) सोशल मीडिया अकाऊंटवरून एक अत्यंत संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. ‘या घटनेने माझे मन हादरले आहे. मी माझ्यावरील अनेक हल्ले सहन केले, पण बहिणीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करण्यासारखा नाही’, असे स्पष्ट केले.
लालू प्रसाद यादव यांच्या या कौटुंबिक वादाला RJD च्या बिहार निवडणुकीतील दारुण पराभवाची पार्श्वभूमी आहे. यंदा पक्षाचे 25 उमेदवार निवडून आले. मागच्या वेळी ही संख्या 75 होती. तसेच संपूर्ण 'महागठबंधन' फक्त 35 जागांपर्यंत पोहोचू शकले. पक्षामध्ये पराभवाचे खापर तेजस्वी यादवा यांच्या धोरणांवर आणि त्यांच्या सल्लागारांच्या प्रभावावर फोडले जात आहे, ज्यामुळे अंतर्गत टीका अधिक वाढली आहे.
एकूणच, बिहारमधील एका शक्तिशाली कुटुंबातील ही अभूतपूर्व फूट केवळ कौटुंबिक नाही, तर RJD च्या राजकीय भविष्यासाठीही एक मोठे आव्हान उभे करत आहे, ज्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.