

दिवंगत बॉलिवूड अभिनेता राजेंद्र कुमार यांच्या पत्नी शुक्ला कुमार यांचे निधन झाले असून, या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित केले. त्यांच्या निधनाने कुमार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.
Actor Rajendra Kumar Wife Shukla Kumar passed away
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांच्या पत्नी शुक्ला कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच बॉलिवूडसह अनेक क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे. शुक्ला कुमार या नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या, शांत आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. अभिनेते कुमार गौरव यांच्या त्या आई होत. रिपोर्ट्सनुसार, १० जानेवारी रोजी प्रार्थना सभा ठेवण्यात आलीय. शुक्ला कुमार नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहिल्या.
राजेंद्र कुमार हे १९६० आणि १९७० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेते मानले जातात. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे शुक्ला कुमार यांचा मोठा वाटा होता. हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स या प्रार्थने सभेत सहभागी होऊन श्रद्धांजली वाहतील. शुक्ला कुमार यांचे निधन कशामुळे झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शुक्ला कुमार यांचे पती बॉलीवूड अभिनेते राजेंद्र कुमार यांचे निधन १९९१ मध्ये झाले होते. रिपोर्टनुसार, ते कॅन्सरने पीडित होते. पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे औषध घेण्यास नकार दिला होता.
शुक्ला कुमार यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मजबूत आहे. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित रमेश बहल आणि श्याम बहल यांची बहिण होत्या. त्या गोल्डी बहल आणि रवि बहल यांची आत्या होत्या. शुक्ला कुमार - राजेंद्र कुमार यांची तीन मुले आहेत. एक मुलगा आणि दोन मुली. मुलगा कुमार गौरवने चित्रपटात पाऊल ठेवले पण त्याला फारसे यश मिळाले नाही.