

Punjabi Singer Rajvir Jawanda passed away
मुंबई - प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जवांदा यांचे निधन झाले आहे. गायक ३५ वर्षांचा होता. बाईक अपघातानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ही घटना २७ सप्टेंबर रोजी घडली होती. त्याच्यावर मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते.
राजवीर जवांदा २७ सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात मोटरसायकलवरून शिमला जात होता. रस्त्यात त्याचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती.
काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी एक्स हँडलवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी राजवीरचा फोटो शेअर करत लिहिले- "एका तरुण आणि आशादायक व्यक्तीच्या दुःखद निधनाने मन दुखावले आहे. राजवीर जावंदा यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना माझ्या मनापासून संवेदना. या अकल्पनीय काळात देव तुम्हाला शक्ती आणि शांती देवो. खूप लवकर गेले, पण कधीही विसरले जाणार नाही."
पंजाबी स्टार हिमांशी खुरानाने देखील सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी देखील एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून राजवीर जवांदा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी लिहिले-'' राजवीर जावंदा यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ते खूप लवकर गेले, पण त्यांचा गोड आवाज पंजाबच्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि लाखो चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना. वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांती देवो.''
काही दिवसांपूर्वी रुग्णालयाने राजवीरच्या आरोग्याबद्दल अपडेट दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, राजवीरची प्रकृती खूप गंभीर आहे. राजवीरच्या निधनाने पंजाबी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.