

पुणे : युवा कलाकारांनी आधी एकांकिकांमध्ये काम करावे. त्यानंतर दीर्घाक, प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक ते चित्रपट, अशी त्यांची चढती पायरी असली पाहिजे. नाटकाकडून चित्रपटाकडे, असा प्रवास झाला पाहिजे. रंगभूमीच आपल्याला मोठी करते. चुका कशा दुरुस्त करायच्या हेही रंगभूमीच शिकवते. येथे काम करून जर पुढे जाता आले, तर कलाकारांच्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण असेल. नवीन कलाकारांचा शोध घेऊन त्यांना संधी देणे, उपलब्ध कलाकारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून नाट्यनिर्मिती करून घेणे, हेच नाट्य परिषदेचे काम आहे. नाटक हे टीमवर्क आहे.
टीमवर्कने काम केल्यास मराठी नाटक अनेक वर्षे टिकेल आणि आपण ते अभिमानाने पुढे नेऊ शकू, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी सोमवारी व्यक्त केले.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण दामले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. गिरीश ओक यांना केशवराव दाते पुरस्कार, प्राजक्ता हनमघर यांना इंदिरा चिटणीस स्मृती विनोदी अभिनेत्री पुरस्कार, निपुण धर्माधिकारी यांना पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पारितोषिक, अवंती बायस यांना माणिक वर्मा पुरस्कार, प्रशांत तपस्वी यांना यशवंत दत्त पुरस्कार, दै. 'पुढारी'च्या बातमीदार सुवर्णा चव्हाण यांना गो. रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष विजय पटवर्धन, शोभा कुलकर्णी, कोषाध्यक्ष अशोक जाधव हे उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी मानवंदना हा कार्यक्रम सादर केला.
पुरस्काराबद्दल बोलताना गिरीश ओक म्हणाले, नाट्य परिषद ही रंगभूमीची मातृसंस्था आहे. त्यामुळे मला मातृसंस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. गेली ४० वर्षे मी नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात नाटकातून केली आणि त्यानंतर मी इतर माध्यमांकडे वळलो. यामुळे नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन हे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे आणि निनाद जाधव यांनी केले. अनिल गुंजाळ, मोहन कुलकर्णी, अभिजित इनामदार, शशिकांत कोठावळे, योगेश सुपेकर, राजेंद्र आलमखाने आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते. संजय गोसावी आणि मधुरा टापरे यांनी सूत्रसंचालन केले.