

पुढारी ऑनलाईन डेस्क - मृणाल कुलकर्णी-ईशा सिंगची नवी मालिका 'पैठणी' भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केलेलं आहे. या मालिकेची निर्मिती झी स्टुडिओज आणि आरंभ एंटरटेनमेंट यांची आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी गोदावरी या भूमिकेत दिसणार असून ईशा सिंग त्यांच्या खंबीर मुलीच्या – कावेरीच्या भूमिकेत झळकणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजी या मालिकेचे प्रीमियर होणार असून त्यामध्ये परंपरा, चिकाटी आणि आई व मुलीचं सशक्त नातं याची झलक दिसणार आहे. ‘आईच्या प्रेमाला मर्यादा नसते’ असं म्हणतात आणि या मालिकेत ते सौंदर्यपूर्ण पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. आयुष्यात कितीही आव्हानं आली, तरी आई व मुलीमधील प्रेम आणि पाठिंबा त्यांचा मार्ग प्रकाशमान करत त्यांचा प्रवास आणखी खास करणारा असतो.
पैठणी या मालिकेत गोदावरीची प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळते. ती आई असते आणि पारपंरिक पैठणी साड्यांची कुशल विणकरही. हाताला कंप सुटत असल्यामुळे आपलं दिमाखदार करियर थांबवण्याची वेळ आलेली असतानाच तिची निश्चयी मुलगी कावेरी तिचा वारसा सुरू ठेवण्याचा निर्णय घेते. आपल्या आईचा वारसा पुढे नेण्यासाठी कावेरी गोदावरीने विणलेली शेवटची साडी तिला भेट म्हणून देण्याचा निर्णय घेते. मात्र, कावेरी तिच्या मोहिमेत यशस्वी होणार का?
कावेरी तिच्या अखंड प्रवासाची सुरुवात करते आणि गोदावरी तिचा आत्मा ओतून शेवटची साडी तयार करते. त्यांचं नातं, त्यांच्यापुढे असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी पुरेसं असेल की हा क्षण त्यांच्या हातातून निसटून जाईल? ‘पैठणी’ ही मालिका प्रेम, त्याग, सक्षमपणा यावर भाष्य करणारा असून त्यात कशाप्रकारे कुटुंब आयुष्यातली आव्हानं पार करण्यासाठी शक्ती आणि चिकाटीची प्रेरणा देऊ शकतं हे दाखवण्यात येणार आहे.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘गोदावरीची भूमिका साकारायला मिळणं हा माझा सन्मान आहे. ही भूमिका खऱ्या अर्थाने आईच्या जबाबदाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. बरीच आव्हाने येऊनही ती आपल्या मुलीला सक्षम आणि खंबीर बनवते व नंतर ती मुलगी आपल्या आईला ताकद देते. तिच्या प्रवासात मला माझे काही पैलू दिसतात आणि मला विश्वास वाटतो, की ही भूमिका आईच्या प्रेमाची ताकद नव्याने सांगेल, शिवाय अनेकांना प्रेरणा देईल. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, माझी सह-कलाकार ईशा सिंग यांच्यासारख्या गुणवत्तापूर्ण टीमबरोबर काम करणं आनंददायी अनुभव होता. सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्याची उत्सुकता मला लागली आहे.’
आई आणि मुलीच्या नात्याचा हृदयस्पर्शी प्रवास पाहण्यासाठी ‘पैठणी’ १५ नोव्हेंबर रोजी प्रीमियर झी ५वर होईल.