

Paach Futacha Bacchan Movie: मराठी रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेलं 'पाच फुटाचा बच्चन' हे एकपात्री प्रायोगिक नाटक आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. नाटकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर याच कथेला चित्रपटाच्या माध्यमातून नव्या रूपात सादर करण्यात येणार असून, आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या पहिल्या टीझर पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
पोस्टरमध्ये विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरेचा प्रभावी आविष्कार पाहायला मिळत आहे. मध्यभागी एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती हरिनामाच्या गजरात रंगलेले वारकरी दिसत आहेत.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले असून, निर्मितीची धुरा राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी सांभाळली आहे. चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
छायांकनाची जबाबदारी अभिषेक शेटे यांनी सांभाळली असून, सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केले आहे. ध्वनी आरेखन शंतनु-दिनेश यांचे असून, निरंजन पेडगावकर यांचे संगीत आणि प्रदीप आवटे यांची गीतरचना चित्रपटाला लाभली आहे. मात्र, चित्रपटाच्या शीर्षकातील 'पाच फुटाचा बच्चन' ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा नेमकी कोण साकारणार, याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे यांनी सांगितले की, सुमारे तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये या नाटकाचे अनेक प्रयोग झाले.
विविध नाट्य महोत्सवांमध्ये नाटकाचे सादरीकरण झाले, अनेक पुरस्कार आणि नामांकनेही मिळाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाचे चित्रीकरण सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी झाले आहे. वारकरी परंपरा, कीर्तनाची संस्कृती आणि एका तरुण कीर्तनकार मुलीचा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणारा 'पाच फुटाचा बच्चन' हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असून, त्याची रिलीज डेट लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.