Nana Patekar Indian Army | केवळ अभिनेता नव्हे, तर कारगिल लढणारा जवान

केवळ अभिनेता नव्हे, तर कारगिल लढणारा जवान
Nana Patekar Indian Army
Nana Patekar Indian Army
Published on: 
Updated on: 

मुंबई : नाना पाटेकर यांची लष्करी सेवा केवळ एका चित्रपटापुरती किंवा केवळ नावापुरती मानद नव्हती, तर त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन खऱ्याखुऱ्या सैनिकासारखी देशसेवा केली होती.

Nana Patekar Indian Army
रंगभूमीवरचा नटसम्राट - नाना पाटेकर

१९९१ मध्ये आलेल्या 'प्रहार' चित्रपटाने नाना पाटेकर यांची आयुष्याकडे पाहण्याची दिशा बदलली. केवळ भूमिकेची मागणी म्हणून त्यांनी जुजबी लष्करी प्रशिक्षण घेतले नाही किंवा तसा पेहराव केला नाही. तर त्यासाठी त्यांनी बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्रीच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये तब्बल ३ वर्षे कमांडोचे कठोर प्रशिक्षण घेतले. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग (जेव्हा ते लेफ्टनंट कर्नल होते) यांच्या मार्गदर्शनाखाली नानांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले होते. या प्रशिक्षणानंतर १९९० मध्ये त्यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद कॅप्टन हे पद बहाल करण्यात आले. पुढे त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढतीही मिळाली. कठोर प्रशिक्षणामुळे लष्करी कमांडोची (मेजर चव्हाण) भूमिका अधिक वास्तववादी वाटली. या चित्रपटातील सर्व स्टंट त्यांनी स्वतः केले होते.

१९९९ चे कारगिल युद्ध: जेव्हा 'नायक' बनला रक्षक

१९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरू झाले, तेव्हा नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला पूर्णविराम देऊन प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्र्यांकडून विशेष परवानगी सुरुवातीला लष्करी अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव एका नागरिकाला सीमेवर पाठवण्यास नकार दिला. मात्र, नाना पाटेकर यांनी थेट तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली. त्यांनी आपले ३ वर्षांचे लष्करी प्रशिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंगमधील कौशल्याचे (३०० मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्यपदक) दाखले दिले. त्यांची देशभक्ती पाहून संरक्षणमंत्र्यांनी त्यांना सीमेवर जाण्याची विशेष परवानगी दिली.

Nana Patekar Indian Army
Naam Foundation Makarand Anaspure Nana Patekar|'नाम'ची मुहूर्तमेढ

लष्करी सेवेचा शारीरिक आणि मानसिक प्रभाव

कारगिलमधील अत्यंत खडतर हवामान, उंच पर्वतरांगा आणि युद्धाच्या कठीण परिस्थितीचा त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जेव्हा ते श्रीनगरला पोहोचले तेव्हा त्यांचे वजन ७६ किलो होते, परंतु केवळ दोन महिन्यांच्या या खडतर सेवेदरम्यान त्यांचे वजन तब्बल २० किलोने घटून ५६ किलो झाले होते.

नाना पाटेकर यांनी जवळपास २५ वर्षे टेरिटोरियल आर्मीमध्ये सेवा दिली आणि २०१३ मध्ये ते या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, "आपले सर्वात मोठे शस्त्र बोफोर्स किंवा ए के-४७ (AK-47) नसून आपले जवान आहेत."

६० दिवस युद्धभूमीवर

नाना पाटेकर मराठा लाइट इन्फंट्रीच्या क्विक रिएक्शन टीम (क्यूआरटी) चे सदस्य बनून थेट फ्रंटलाईनवर तैनात झाले. त्यांनी द्रास, सोपोर, कुपवाडा, लेह आणि बारामुल्ला या अत्यंत धोकादायक आणि संवेदनशील युद्धक्षेत्रांमध्ये तब्बल ६० दिवस काढले. ते केवळ निरीक्षकाची भूमिका करत नव्हते, तर त्यांनी जवानांसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) घातली आणि लष्करी रुग्णालयांमध्ये जाऊन जखमी सैनिकांची सेवा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news