

Subodh Bhave-Rinku Rajguru song released
मुंबई - अभिनेता सुबोध भावे आणि रिंकू राजगुरुचे मिश्किल नाते बेटर हाफची लव्हस्टोरी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हास्याने भरलेली ही प्रेमकाहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. पालतू पालतू असे गाण्याचे नाव आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांसाठी एक भन्नाट, गंमतीशीर अनुभव घेऊन आलं आहे.
या गाण्यातून प्रेक्षकांना लग्नानंतरच्या नात्याची गंमतीशीर बाजू पाहायला मिळते. आजच्या तरुण प्रेक्षकांना ही शैली स्वतःशी मिळतीजुळती वाटू शकते आणि म्हणूनच हा चित्रपटही त्यांना जोडून ठेवेल.
रजत अग्रवाल, निर्माता
या चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू आणि अनिकेत विश्वासराव यांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. येत्या २२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका वेगळ्या आणि मजेशीर लव्ह ट्रँगलची कहाणी पाहायला मिळेल.
पालतू फालतू हे गाणं प्रत्येक नवऱ्याच्या मनातील हक्काच्या बडबडीचं प्रतिनिधित्व करतं. सुबोध आणि रिंकूने या दृश्यांना ज्या सहजतेने जिवंत केलं, ते खरंच बघण्यासारखं आहे. हे एक गंमतीशीर गाणं आहे.
संजय अमर, दिग्दर्शक
सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं लग्नानंतरची परिस्थिती दाखवणारं आहे. सुबोध भावेच्या मनातील वैताग, गोंधळ आणि त्याच्या प्रतिक्रियांचा एक मिश्कील कोलाज गाण्यातून समोर आले आहे. हे गाणे गायक अवधूत गुप्तेने गायलं आहे. गाण्याचे बोल संजय अमर आणि साजन पटेल यांचे आहेत. अमेय नरे आणि साजन पटेल यांचं संगीत आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचं लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचे आहे.