
Mission Impossible 8 India box office
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात हॉलिवूड चित्रपटांना मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. भारतातही हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ खूप जास्त आहे. भारतात असणा-या क्रेझमुळेच अनेक चित्रपट प्रथम भारतात आणि नंतर परदेशात प्रदर्शित होत आहेत. भारतात टॉम क्रूझचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा 'मिशन इम्पॉसिबल ८' म्हणजेच 'मिशन इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग' हा चित्रपट भारतात प्रथम प्रदर्शित करण्यात आला आहे.
हा चित्रपट १७ मे रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, तर तो २३ मे रोजी अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. टॉम क्रूझच्या या चित्रपटाने आतापर्यंत भारतात किती कमाई केली आहे आपल्याला माहित आहे का ? चला तर मग जाणून घेऊया.
सोमवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी 'मिशन इम्पॉसिबल ८' या चित्रपटाने अंदाजे ३.९९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर रविवारी चित्रपटाने १७ कोटी रुपये कमाई करण्यात यश मिळवले. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १६.५ कोटी रुपयांची कमाई केली. आठवड्याच्या शेवटी बहुतेक चित्रपटांचे कलेक्शन कमी होते. यामुळेच सोमवारी भारतात टॉम क्रूझच्या चित्रपटाची कमाई कमी झाली.
भारतात 'मिशन इम्पॉसिबल ८' च्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तिसऱ्या दिवशीपर्यंत चित्रपटाने एकूण ३४.४९ कोटी रुपयाचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे ३,३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. सध्या भारतात कोणताही मोठा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला नसल्याने हा चित्रपट अजूनही भारतात चांगले कलेक्शन करू शकतो.
हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझ व्यतिरिक्त, 'मिशन इम्पॉसिबल ८' चित्रपटात विंग्स रेम्स, सायमन पेग, निक ऑफरमन, अँजेला बॅसेट आणि हेली एटवेल सारखे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी केले आहे.