ओ... चाचा!! मुन्ना भैय्या नसल्याने Mirzapur 3 वर चाहते नाराज; मुन्नाला जिवंत करणार का?

मुन्ना भैय्याची अनुपस्थिती चाहत्यांना खटकली
Mirzapur 3 Munna Bhaiyya
वेब सिरीज मिर्झापूर 3 मध्ये मुन्ना भैय्या ही भूमिका दिव्येंदु शर्मा या अभिनेत्याने साकारली आहेFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mirzapur 3 : चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मोस्ट अवेटेड वेब सिरीज मिर्झापूर 3 रिलीज झाली. पण दुर्दैवाने हा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला दिसत नाहीय. मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये आला तेव्हा त्यातील ॲक़्शन, कपट, राजकारण, पॉवरने चाहत्यांना वेड लावले होते. दिव्येंदू शर्माच्या मुन्ना भय्या आणि पंकज त्रिपाठीच्या कालीन भैय्या यांच्या खतरनाक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर विक्रांत मेसीचे पात्र बबलू पंडित याच्या हत्येचे दु:खही झाले होते. दुस-या सीझनमध्ये गुड्डू पंडितच्या (अली फजल) सूडकथेने चाहत्यांना खिळवून ठेवले. पण तिस-या सीझन पाहून अनेकांनी नाके मुरडली.

मिर्झापूरचा नवी सीझन प्रदर्शित होताच उत्साहित चाहत्यांनी लगेचच पाहून संपवला. पण मिर्झापूर 3 पाहून आमची निराशा झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. गुड्डू पंडीत, कालिन भैय्या यांच्यातला संघर्ष ठिकठाक आहे. मात्र, मुन्ना भैय्याची अनुपस्थिती आम्हाला खटकली, अशाही भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या.

Mirzapur 3 Munna Bhaiyya
मिर्झापूर सीझन 3: पात्रांची गर्दी, बीना भाभीची घुसमट आणि गुड्डू भैय्याची (नुसतीच) दहशत

‘मिर्झापूर’चा केंद्रबिंदू

या सीझनमध्ये जाणवणाऱ्या रिकामपणाचं कारण म्हणजे मुन्ना भैयाची अनुपस्थिती. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुन्ना भैया हा ‘मिर्झापूर’चा केंद्रबिंदू होता. गुड्डूच्या सूडाग्निपासून ते जेपी यादवच्या रागापर्यंत तोच केंद्रस्थानी राहिला.

अनेक रंगछटा

खलनायक असूनही लोकांना मुन्ना हे पात्र आवडले. कारण त्या पात्रामध्ये अनेक रंगछटा आहेत. दिव्येंदू शर्मानेही ही भूमिका ताकदीने वठवली आहेत. पण दुस-या सीझनच्या शेवटाला गुड्डू पंडितने खात्मा केल्याने मुन्नाला तिस-या सीझनमध्ये वावच राहिला नाही. परिणामी या सीझनमधील त्याच्या अनुपस्थितीमुळे चाहते अस्वस्थ झाले. तिसरा सीझन पाहताना चाहते मुन्नाचे कमबॅक आत होईल याच आशेने एपिसोड पाहत राहिले. पण त्यांची घोर निराशा झाली.

मुन्ना भैय्या व्यक्ती म्हणून एकाकी

बापाच्या सत्ता संपत्तीच्या जोरावर मुन्ना भैय्या ताकदवान आहे. त्यातूनच त्याच्यात बेदरकारपणा आलेला आहे. पण एक व्यक्ती म्हणून तो एकाकी आहे. आईचे छत्र लहानपणीच हरवले आहे. बाप कालीन भैय्या आणि आज्जा यांनीच त्याला लहानाचा मोठा केला. पण आपला बाप आपल्याला योग्य वागणूक देत नसल्याची मुन्नाची तक्रार असते. तसे तो हे बोलून दाखवत नाही पण त्याच्या बोलण्या वागण्यातून ते दिसते. मुन्नाला माहीत आहे की, त्याच्याकडे जे काही आहे, ते काही त्याचे नाही. अशा परिस्थितीत कुणाचे प्रेम आणि मैत्री मुन्नाला आनंद देत नाही. कारण त्याचे म्हणणे आहे की सर्व काही खोटे आहे. त्याचा बालपणीचा मित्र कंपाउंडर देखील आपल्या फायद्यासाठी कालीन भैय्याला मारायला तयार होतो. जेणेकरून मुन्ना भैय्या गादीवर बसेल आणि आपला फायदा होईल.

मिर्झापूर-२ मधील ‘हे’ आहेत जबरदस्त डायलॉग!

कंपाउंडरची मैत्री

मुन्नाचे पात्र तीन ठिकाणी बदलते, प्रथम जेव्हा कालीन भैया त्याला कंपाउंडरला मारण्यासाठी बोलावतो. त्यावेळी त्याला कळते की कंपाउंडर त्याला खरोखर मित्र मानत होता, त्याच्यासाठी मुन्नाची मैत्रीच सर्वस्व होती, कंपाउंडरचा मिर्झापूरच्या गादीशी काही संबंध नव्हता, ना कालीन भैय्याशी. तो मुन्नाच्या बापासमोर आपले तोंडही उघडत नाही. कंपाउंडरला हवे असते तर तो सौदा करू शकला असता पण तो मुन्नाची साथ शेवटपर्यंत सोडत नाही.

प्रेमाला तिलांजली

त्या क्षणापर्यंत मुन्नाला कंपाउंडरचे महत्त्व कळले नव्हते. पण जेव्हा त्याला कंपाउंडरच्या मैत्रीची प्रचिती येते तेव्हा उशीर झालेला असतो. दुदैवाने मुन्नाला स्वत:च्याच हाताने आपल्या खास दोस्ताचा गळा चिरावा लागतो. खरतर मुन्ना भैय्या इथे स्वत:ला वाचवण्यासाठी कंपाउंडरचा बळी देतो. मुन्ना जिच्यावर एकतर्फी प्रेम करतो, त्या स्वीटीलाही गोळ्या घालण्यात मागेपुढे पाहत नाही. एका क्षणात तो गुड्डू पंडितचा भाऊ बबलू पंडित आणि पत्नी स्विटी यांना ठार करतो. तिथून पुढे प्रेमाला तिलांजली देऊन तो मिर्झापूरचे सिंहासन काबिज करण्याचे ध्येय बाळगतो.

मिर्झापूर निर्माता, ॲमेझॉन प्राईमला नोटीस

माधुरीसाठी मुन्ना फक्त मुन्ना

मुन्ना दुसऱ्यांदा बदलतो, ते त्याच्या आयुष्यात माधुरीच्या येण्याने. पण स्विटीवर जसा त्याचा जीव होता तशा फिलिंग माधुरीच्या बाबतीत नसतात. अशातच मुन्ना काय करतो, तो कुठे असतो, याचा माधुरीलाही काही फरक पडत नाही. पण ती मुन्नाला एवढंच सांगते की, काहीही कर पण तुझे हृदय माझ्याशिवाय इतर कोणालाही देऊ नकोस. कंपाउंडरनंतर माधुरी होती जिच्यासाठी मुन्ना फक्त मुन्ना आहे, चांगला किंवा वाईट.

माधुरीच्या येण्याने मवाळ

कंपाउंडर गेल्यानंतर मुन्ना जितका हिंसक होतो, तितकाच तो माधुरीच्या आयुष्यातील येण्याने मवाळ झाला होतो. एका सीनमध्ये जेव्हा तो म्हणतो की, ‘जेव्हा एखादी गोष्ट अशीच मिळून जाते तेव्हा त्याचे महत्त्व कळत नाही.’ त्या सीनमध्ये मुन्ना हा माधुरी आणि कंपाउंडर या दोघांबद्दल बोलतो.

मुन्नाच्या मृत्यूचे दु:ख

मुन्नाच्या मृत्यूचे दु:ख प्रेक्षकांना वाटणे साहजिक आहे, पण त्या व्यक्तिरेखेचा प्रवास संपुष्टात आला होता. एक बेदरकार मुलगा ज्याला लोक घाबरतात, त्याची चापलूसी करतात, तिरस्कार देखील करतात, परंतु कोणीही प्रेम करत नाही. त्याच्या आयुष्यात माधुरी येते. त्याला कळून चुकते की त्याचे आयुष्य इतकेही नकली नव्हते. कंपाउंडर सारखा मित्र आणि माधुरीचे प्रेम त्याने कोणत्याही पॉवरशिवाय आणि कोणताही गाजावाजा न करता मिळवले होते.

मुन्ना भैय्याला अमरत्व

दुस-या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये कालीन भैय्या मुन्नाला बाहुबली नव्हे तर बाप म्हणून मिठी मारतो आणि सांगतो की, मिर्झापूरचे सिंहासन तुझे आहे, तू या सिंहासनाच्या लायक आहेस. तेव्हा मुन्ना भैय्या या पात्राला आणखीन भारदस्त बनते. पण अखेरीस त्याच्या मृत्यूने हे पात्र पूर्ण होते. वेब सीरिजमधला सर्वात सुंदर मृत्यू म्हणूनही चाहते त्याच्याकडे पाहतात. मुन्ना भैय्याच्या मृत्यूमुळे ‘मिर्झापूर’ची रया जरी गेली असली तरी अशा अनेक छटा असणारे पात्र लिहिण्यासाठी एक चांगला लेखक गरजेचा आहेच. पण ती भूमिका साकारण्यासाठी दिव्येंदूच्या कॅलिबरचा अभिनेताही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांनीही मुन्ना नंतरही मालिका बघायला हवी. कारण मुन्ना मेला नसता तर या पात्राचे ओझं वाटू लागलं असतं. पण मृत्यू झाल्याने या पात्राला अमरत्व प्राप्त झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news