

Matka King Trailer Out: बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा याची बहुप्रतिक्षित वेब सीरीज ‘मटका किंग’ सध्या चर्चेत आहे. या सीरीजचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून अवघ्या 2 मिनिटे 25 सेकंदांच्या या व्हिडिओने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ट्रेलरची सुरुवात 1960 च्या दशकातील बदलत्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर होते. यात बृज भट्टी नावाच्या एका महत्त्वाकांक्षी व्यक्तीची कथा दाखवली आहे, जो परिस्थितीशी झुंज देत ‘मटका’ नावाचा जुगाराचा व्यवसाय उभा करतो. हा व्यवसाय इतका मोठा होतो की लोक त्यावर बँकेपेक्षाही जास्त विश्वास ठेवू लागतात.
सीरीजमध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून त्याने साकारलेला बृज भट्टी हा धाडसी, हुशार आणि मोठी स्वप्ने पाहणारा व्यक्ती आहे. 'बृज भट्टी वो आदमी था, जिसने मौके पर खेलकर इतना पैसा कमाया कि सरकारी खजाना भी उसके सामने चिल्लर लगने लगा।', 'जिंदगी भी कितनी अजीब सिर्फ एक चीज पर चलती है- उम्मीद!', 'चाहे वो अमीर हो या गरीब सबको जिंदगी में छलांग लगाने का हक होना चाहिए।', हे डायलॉग ट्रेलरमध्ये ठळकपणे दिसतात.
मात्र, जिथे जास्त पैसा असतो तिथे धोका देखील जास्तच असतो. बृज भट्टीचा हा ‘मटका’ व्यवसाय पोलिसांच्या नजरेत येतो आणि त्याच्याविरोधात संघर्ष सुरू होतो. एक स्वप्न पाहण्यापासून सुरू झालेली ही कहाणी शेवटी त्याच्यासाठी संकट ठरेल का, असा प्रश्न आहे.
ही वेब सीरीज नागराज मंजुळे आणि अभय कोरान्ने यांनी लिहिली असून ती फक्त पीरियड ड्रामा नसून एका माणसाचा संघर्ष, स्वप्न आणि सिस्टीम बदलण्याच्या प्रवासाची कथा आहे.
सीरीजमध्ये कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोवर, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी यांसारखी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सई ताम्हणकर बृज भट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘मटका किंग’ ही वेब सीरीज 17 एप्रिल 2026 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. ही सीरीज भारतासह जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहता ‘मटका किंग’ ही केवळ जुगाराच्या दुनियेची कथा नसून स्वप्न, संघर्ष आणि सत्तेच्या खेळाची थरारक कहाणी असल्याचे दिसत आहे.