

Swati Deval conversion attempt Video: मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध बाजारपेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती देवल यांना बाजारात शॉपिंग करत असताना काही संशयास्पद महिलांनी गाठून धर्मांतराच्या उद्देशाने किंवा अन्य कारणाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. स्वाती देवल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा अनुभव शेअर करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. स्वाती देवल यांनी आपण म्हणत होतो भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे असे देखील वक्तव्य केलं.
स्वाती देवल या बोरीवली वेस्ट येथील इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा या अत्यंत गजबजलेल्या परिसरात शॉपिंगसाठी गेल्या होत्या. तिथे खरेदी करत असताना साधारण २८ ते ३० वयोगटातील एक सुशिक्षित दिसणारी महिला त्यांच्याजवळ आली. तिने हिंदीत संवाद साधत, "मॅम, मला तुमच्याशी बायबल विषयावर बोलायचे आहे, तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल का?" अशी विचारणा केली.
स्वाती देवल यांनी तातडीने तिला नकार दिला आणि तिथून पुढे निघून गेल्या. मात्र, तरीही ती महिला त्यांच्या आजूबाजूलाच गिरट्या घालत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
स्वाती यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती महिला दिसायला चांगल्या घरातील वाटत होती आणि तिने खांद्याला पर्स लटकवलेली होती, ज्यामुळे ती संशयास्पद वाटत नव्हती.
नकार दिल्यानंतरही ती महिला बाजारातील इतर महिलांना थांबवून त्यांच्याशी अशाच प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करत होती.
काही वेळाने ती दुसऱ्या एका मुलीला भेटली, जी स्वतः अशाच प्रकारे लोकांमध्ये फिरून आली होती.
या दोन्ही महिलांनी कोणाचेही लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने एकमेकींच्या कानात कुजबुज केली, ज्यामुळे त्यांच्या हालचाली अत्यंत संशयास्पद वाटल्या.
स्वाती देवल यांनी या घटनेबद्दल खंत व्यक्त करताना सांगितले की, "माझं इथे चुकलं की मी त्या महिलांचे शूटिंग केले नाही." मात्र, अशा अनोळखी लोकांशी जास्त संवाद न साधणे आणि त्यांना एंटरटेन न करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची 'वाईट कर्म' करणारी लोकं वावरत असू शकतात आणि जोवर त्याची झळ आपल्याला पोहोचत नाही, तोवर आपल्याला गांभीर्य समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणीही अनोळखी व्यक्ती धर्माच्या किंवा अन्य विषयाच्या नावाखाली जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल, तर वेळीच सावध राहावे, असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे.