

Mahima Makwana Marathi Connection: नेटफ्लिक्सवरील 'मुसाफिर कॅफे' या वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेतील 'प्रीती' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा मकवाना हिच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या महिमाचा महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी असलेला जवळचा संबंध अनेकांना माहीत नाही. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक आठवणी सांगितल्या आहेत.
महिमा म्हणाली की, तिची आई महाराष्ट्रातील असल्यामुळे लहानपणापासूनच तिच्यावर मराठी संस्कृतीचे संस्कार झाले. ती मुंबईतील दहिसरमध्ये जन्मली आणि वाढली. दहिसरमधील मच्छी मार्केट परिसरात तिचं बालपण गेल्याचं सांगताना ती म्हणाली, "यापेक्षा जास्त मराठमोळं काय असू शकतं?" तिने सांगितलं की, तिचं आडनाव 'मकवाना' असल्यामुळे अनेकांना ती मराठी बोलू शकणार नाही, अशी शंका यायची. मात्र घरात आजही ती मराठीतच बोलते.
महिमाने मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, "लोकांना वाटतं मी गुजराती आहे म्हणून मला मराठी येत नसेल. पण मी घरी मराठीतच बोलते. मराठी ही खूप सुंदर भाषा आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे." ती पुढे म्हणाली की, तिची मराठी थोडी बोलीभाषेतील असली तरी ती मनापासून मराठीशी जोडलेली आहे.
महिमाने सांगितलं की, तिच्या आईची कायम इच्छा होती की, तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतून करावी. मात्र विविध कारणांमुळे तसं घडलं नाही. "आईला नेहमी वाटायचं की मी मराठी सिनेमातून करिअर सुरू करावं. त्या काळात आमच्या घरी केबलवर मराठी चित्रपटच जास्त पाहिले जायचे. त्यामुळे मराठी कलाविश्वाशी माझं नातं खूप जुनं आहे," असे ती म्हणाली.
महिमाने तिच्या बालपणातील संघर्षही सांगितला. ती जन्मल्यानंतर काही महिन्यांतच तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी तिच्या आईवर आली. तिने सांगितलं की, तिच्या आईने शिवणकामासह अनेक छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असली तरी आईने कधीही हार मानली नाही.
आज महिमा मकवाना वेबसीरिज, चित्रपट आणि जाहिरातींमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. 'मुसाफिर कॅफे'मधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र या यशामागे संघर्ष आणि आईचे कष्ट असल्याचे महिमाने सांगितले.