

The Accidental Cockroach Party: देशभरात चर्चेत असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाची कथा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे. आता या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' (The Accidental Cockroach Party) नावाचा बिग बजेट चित्रपट तयार होत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर याबाबत उत्सुकता वाढली आहे.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडी, आंदोलनामागील नियोजन आणि पडद्यामागे घडलेल्या घटनांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.
निर्मात्यांच्या माहितीनुसार, हा चित्रपट केवळ आंदोलनाचे दृश्य दाखवणार नाही, तर त्या काळातील अनेक अशा गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करेल ज्या आतापर्यंत सार्वजनिक चर्चेत फारशा समोर आल्या नव्हत्या.
या चित्रपटाची संकल्पना जयपूरचे संशोधक आणि लेखक गोविंद देव ब्रह्म यांनी मांडली असून, त्यांनी विस्तृत संशोधन केल्यानंतर पटकथेवर काम सुरू केले आहे. सध्या पटकथेचे काम अंतिम टप्प्यात असून चित्रपटासाठी विविध शूटिंग लोकेशन्स निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' हा सुमारे 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटचा चित्रपट असणार आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या भूमिकेची. ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, निर्माते आणि दिग्दर्शक या भूमिकेसाठी चांगल्या कलाकाराच्या शोधात असल्याची माहिती समोर येत आहे.
चित्रपटासाठी स्टार कास्ट, दिग्दर्शक आणि सहनिर्मात्यांची निवड करण्यासाठी मुंबईतील अनेक मोठ्या निर्मिती संस्थांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच कलाकारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण नियोजनानुसार पूर्ण झाल्यास 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' हा चित्रपट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, राजकीय घडामोडी आणि त्यामागील घटनांचा वेगळ्या दृष्टिकोनातून मागोवा घेणारा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, अभिजीत दीपके यांच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याची निवड होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.