

Mahesh Manjrekar upcoming film Punha Shivajiraje Bhosale new look
मुंबई - महेश मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. टिझरवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा तुफान पाऊस पडतोय. शिवाय, चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आताचित्रपटाबाबत एक नवी गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे, महेश मांजरेकर यांची भूमिका.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्यात महेश मांजरेकर यांचा लूक लक्षवेधी ठरला आहे. या चित्रपटातील दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर महेश मांजरेकरांचा लूक रिलीज होताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि गंभीर अवतार पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. ऐतिहासिक भूमिकांमध्ये महेश मांजरेकर यांची भूमिका नेहमीच सरस आणि ठळक जाणवते. आता नव्या चित्रपटात आणखी दमदार भूमिका पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
विविध भूमिका साकारलेले मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत झळकले आहेत. डोक्यावर विशिष्ट फेटा, त्यावर रुद्राक्षाच्या माळा, गळ्यातही लांबलचक रुद्राक्षांच्या माळा, भेदक नजर असा त्यांचा लूक दिसतो आहे. भगव्या वेशातील महेश मांजरेकर यांचा साधू रूपातील अतिशय वेगळा लूक पाहायला मिळत आहे. लांब दाढी आणि हातात शंख यामुळे त्यांची व्यक्तिरेखा आणखी उठावदार दिसते.
महेश मांजरेकर म्हणाले, 'आजवर मी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु साधूच्या व्यक्तिरेखेत मी कधीच दिसलो नव्हतो. हा लूक माझ्या नेहमीच्या लूकपेक्षा वेगळा आहे. गूढता, ताकद आणि अध्यात्मिक छटा हे सगळं एकत्र येऊन या भूमिकेला एक आगळावेगळा आयाम मिळाला आहे...'
झी स्टुडिओज प्रस्तुत, द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित हा चित्रपट येत्या ३१ ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध या चित्रपटाचे निर्माते असून यात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.