

Anshula Kapoor’s Engagement Photos viral
मुंबई - बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर परिवारात खास सोहळा रंगला. बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर हिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या समारंभात संपूर्ण कपूर फॅमिली एकत्र आली होती. शनायाने अंशुलाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंशुलाने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून मोठी पोस्ट लिहिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, अंशुलाने आपल्या खास व्यक्तीसोबत एका खासगी समारंभात साखरपुडा केला होता. हा कार्यक्रम फारसा मोठा न ठेवता फक्त जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या समारंभाला कपूर घराण्यातील अनेक सदस्यांनी उपस्थिती लावली. या खास क्षणाला शनाया कपूर, खुशी कपूर आणि सोनम कपूर, बोनी कपूर यांनी अंशुलाला शुभेच्छा देत तिच्या आनंदात सहभागी झाल्या. सोशल मीडियावर समारंभातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, अंशुला कपूर या खास प्रसंगी आकर्षक ड्रेसमध्ये दिसली.
अंशुला कपूरने मनोगत व्यक्त केलं. २-१०-२०२५ अशी तारीख तिने पोस्टमध्ये लिहिलीय. तिच्या मते हा फक्त एक समारंभ नव्हता, तर प्रत्येक छोट्या-छोट्या क्षणातून झळकणारं प्रेम होतं. तिच्या जोडीदाराचे आवडते शब्द “हमेशा आणि हमेशा के लिए” आज खर्या अर्थाने जगल्यासारखे वाटले. हास्य, आलिंगन, शुभेच्छा आणि आपुलकीने भरलेला तो सोहळा तिला जादुई वाटला. विशेष म्हणजे, तिच्या आईची आठवण प्रत्येक क्षणी जाणवत होती—फुलांत, शब्दांत, त्यांच्या खुर्चीत आणि वातावरणात. अंशुलाने व्यक्त केलं की, या क्षणी तिला फक्त एकच विचार डोकावत होता: “नेहमीच असंच वाटत राहावं.”
अंशुला कपूर आणि मंगेतर रोहन ठक्करने एका खासगी समारंभात एकमेकांना अंगठी घातली होती. शनाया कपूरने इन्स्टाग्रामवर आपली चुलत बहिण अंशुला कपूरच्या या खास दिनाचे काही सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. शनायाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आईसोबत बसलेली दिसते. आणखी काही फोटोंमध्ये त्या डायनिंग टेबलवर बसलेल्या दिसतात. समोर डोसा आणि चटणीच्या विविध वाट्या ठेवलेल्या दिसतात. सोबत जहान कपूर देखील कॅमेराच्या समोर पोझ देताना दिसताहेत.