

PM Modi Maa Vande biopic announced
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘मा वंदे’. विशेष म्हणजे, या चित्रपटात पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारणार आहे साऊथचा लोकप्रिय अभिनेता उन्नी मुकुंदन. नुकतेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कॉमेंट्स येत आहेत.
१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या खास औचित्याने पीएम मोदी यांचे बायोपिक 'मां वंदे'ची घोषणा करण्यात आलीय. मल्याळम सपुरस्टार आणि मार्को चित्रपट फेम उन्नी मुकुंदनने मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केलीय.
‘मार्को’ आणि इतर अनेक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा उन्नी मुकुंदन पहिल्यांदाच इतक्या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारतो आहे. पोस्टरमध्ये त्याचा साधा पण प्रभावी लूक दाखवण्यात आला आहे. केसांची स्टाईल, पोशाख आणि गंभीर भाव या सगळ्यामुळे मुकुंदन अगदी नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसत आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ‘मां वंदे’ हा चित्रपट मोदींच्या आयुष्यावर आधारित असून, त्यांचा संघर्षमय प्रवास यात दिसणार आहे. मोदी यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास कथेतून उलगडण्यात येईल. त्यांच्या जीवनातील चढ-उतार देखील दर्शवण्यात येणार आहेत.
'मां वंदे' क्रांति कुमार सीएच दिग्दर्शित करत आहे. सिनेमेटोग्राफी केके सेंथिल कुमार (बाहुबली, ईगा चित्रपट) यांचे, संगीत रवि बसरूर यांचे तर एडिटिंग श्रीकर प्रसाद यांचे आहे.
फर्स्ट लूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर या बायोपिकची चर्चा होती. अनेक नेटकऱ्यांनी यास कॉमेंट्स देणेही सुरु केले. निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, २०२५ च्या शेवटी हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. हिंदीसोबतच इतर भाषांमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती समोर आलीय.