

Khalid Ka Shivaji OTT Release: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित आणि प्रदर्शनापूर्वी विविध कारणांनी चर्चेत राहिलेला 'खालिद का शिवाजी' हा मराठी चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे.
हा चित्रपट एका निरागस मुस्लिम मुलाच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, मानवता आणि सामाजिक समतेचा संदेश मांडतो. धार्मिक आणि सामाजिक भेदभावाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. शाळेत 'अफजलखान' म्हणून चिडवले जाणाऱ्या खालिदच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यातून माणुसकीचा खरा अर्थ समजून घेतो.
चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्यासह बालकलाकार क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, पटकथा आणि कथा कैलास वाघमारे यांनी लिहिली आहे. निर्मितीची धुरा मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी सांभाळली आहे.
दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांनी सांगितले की, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून, या प्रकल्पासाठी त्यांनी अनेक वर्षे मेहनत घेतली. आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना ओटीटीच्या माध्यमातून पाहता येणार असल्याचा त्यांना आनंद आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व्यापक अर्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
निर्माते मायकल थेवर यांच्या मते, आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगण्याची गरज आहे. धर्म, जात आणि सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारा हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील Marché du Film, IFFI इंडियन पॅनोरामा 2025 आणि अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील India Focus Special Screening या प्रतिष्ठित व्यासपीठांवर चित्रपटाची निवड झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी बोलीचा वापर करण्यात आला आहे. स्थानिक कलाकारांनाही महत्त्वाच्या भूमिका देण्यात आल्याने या चित्रपटाला वास्तवतेची वेगळी छटा लाभली आहे.
ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आता उत्तम संधी आहे. 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.