

FIR On Kannada Director S Narayan
बंगळुरू : सँडलवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस. नारायण यांच्यावर त्यांची सून पवित्राने गंभीर आरोप केले आहेत. तिने बंगळुरु पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एस. नारायण यांची पत्नी भाग्यवती आणि मुलगा पवन यांच्याविरुद्ध ज्ञानभारती पोलिस ठाण्यात तिने हुंडा छळाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची सून पवित्राने त्यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे आणि पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण पाहता पोलिसांनी नारायण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना नोटीस बजावली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
पवित्राने २०२१ मध्ये पवनशी लग्न केले होते. आता तिने तिचा पती आणि सासरच्या लोकांवर जास्त हुंडा आणण्यासाठी भाग पाडल्याबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी केली.
तिच्या तक्रारीत पवित्रा म्हणाली की, ''तिचा पती बेरोजगार आहे आणि त्याचे शिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतर ते सासर सोडून भाड्याच्या घरात राहायला गेले होते. पण एक वर्षांनंतर आपल्या माहेरी परतले.''
''पवनने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही, त्यामुळे त्याच्कडे कोणतीही नोकरी नाही. यानंतर तिने आपल्या परिवारासाठी काम करणे सुरू केले. काही दिवसांपूर्वी, पवनने तिच्याकडे १ लाख रुपये आणि आईकडून ७५ हजार रुपये कार खरेदी करण्यासाठी घेतले होते. दरम्यान, पवनने कला सम्राट फिल्म ॲकॅडमी सुरू केली आणि तिने पवनच्या आर्थिक मदतीसाठी आईचे सोने गहाणवट ठेवले. पण नंतर ॲकॅडमी बंद झाली. पवित्राने पोलसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "पवनने तिच्याकडे पुन्हा पैसे मागितले आणि तिने १० लाख रुपयांचे प्रोफेशनल लोन घेतले. पवनने काही मासिक हप्ते फेडले आणि नंतर काम बंद केलं."
पवित्राने सांगितले की, तिच्या वडिलांनी लग्नात पवनला १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची सोन्याची अंगठी भेट दिली होती आणि लग्नाचा खर्चही त्यांनी उचलला होता. तरीही, नारायण आणि त्याची पत्नी भाग्यवती यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या एका महिन्यानंतर भांडण झाल्यानंतर तिला दोषी ठरवले होते.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी नारायण आणि इतरांना नोटीस बजावली आहे आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
एस नारायण कन्नड चित्रपटाचे दिग्गज निर्माते आहेत. त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
या प्रकरणी एस नारायण यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ते म्हणाले, ”पवित्राला घर सोडून १० महिने झाले आहेत. जर मी तिला विचारले की, तिने घर का सोडले? तर तिच्या नावावर कलंक लावण्यासारखे ठरेल. लग्नाच्या एक महिन्यानंतरच आमची बातचीत बंद झाली होती.”