

जितेंद्र जोशीच्या ‘मॅजिक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, एका एन्काऊंटरमागील रहस्य आणि सत्याचा शोध ही या चित्रपटाची मुख्य कथा असल्याचं दिसून येत आहे. दमदार अभिनय आणि थरारक मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ही कथा रहस्यमय आहे. एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक' काय आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना हा चित्रपट गुंतवून ठेवतो. नुकताच अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
सायकोलॉजिकल पद्धतीनं गोष्ट उलगडणारा 'मॅजिक' हा चित्रपट नव्या वर्षात, १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मॅजिक’ चित्रपटाची कथा एका एन्काऊंटरभोवती फिरताना दिसते. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांमधून एन्काऊंटरमागील सत्य, पोलिस तपास आणि त्यात दडलेलं गूढ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
तुतरी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कथालेखन योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांचे आहे. अभिषेक देशमुख यांचे पटकथा लेखन, केदार फडके यांचे छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांचे संकलन आहे.
'हे' आहेत चित्रपटातील कलाकार
चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या मुख्य भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, रुपा मांगले, नितीन भजन, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, रसिकराज प्रदीप डोईफोडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाच्या कथेविषयी...
एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट "मॅजिक" या चित्रपटात आहे. एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलिस अधिकारी गावी येतो, पण एक मुलगी तिथं पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ... हे नेमकं प्रकरण काय आहे, एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध असतो, ती मुलगी नेमकी कोण असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच मिळणार आहेत.
जितेंद्र जोशीने याआधीही अनेक गंभीर आणि वास्तववादी भूमिका साकारून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. त्यामुळे ‘मॅजिक’मधील त्याचा परफॉर्मन्सही विशेष ठरणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.