

Inspector Zende Trailer Launch
मुंबई : मनोज वाजपेयीचा आगामी चित्रपट इन्स्पेक्टर झेंडेचा ट्रेलर रिलीज झाला. निर्मात्यांनी याची रिलीज डेटसह चित्रपट कुठे आणि कधी पाहता येणार, याबद्दल घोषणा केलीय. नेटफ्लिक्सच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. हा चित्रपट चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शित केला आहे. निर्मिती ओम राऊत आणि जय शिवकरणमणि यांची आहे.
२ मिनिट ३२ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी एका चतुर पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे. तो एक गुंतागुंतीची केस सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करतो आणि त्याला यश देखील मिळतं. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी कॉमेडी देखील करताना दिसतो आहे.
मनोज इन्स्पेक्टर मधुकर झेंडेच्या तर जिम सार्भ बिकिनी किलर चार्ल्सच्या भूमिकेत दिसेल. बालचंद्र कदम, जिम सार्भ, सचिन खेडेकर, गिरिजा ओक या कलाकारांची महत्त्वाची भूमिका असेल.
हा चित्रपट 'इन्स्पेक्टर झेंडे' मुंबई पोलिसांच्या एका खऱ्या आणि निडर इन्स्पेक्टरच्या कहाणीशी प्रेरित आहे. १९८६ मध्ये 'सीरियल किलर' (बिकिनी किलर) नावाने प्रसिद्ध चार्ल्स शोभराजला पकणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या रिअल स्टोरीवर आधारित आहे. कशाप्रकारे झेंडे आपल्या कौशल्याने सीरियल किलर पकडतो, हे चित्रपटात पाहायला मिळेल.
हा भारतीय-व्हिएतनामी वंशाचा फ्रेंच सिरीयल किलर होता. तो लोकांची फसवणूक करणारा आणि चोर असतो. शोभराजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान २० पर्यटकांची हत्या केली होती. ज्यात थायलंडमधील १४ पर्यटकांचा समावेश होता. त्याला १९७६ ते १९९७ या काळात भारतात दोषी ठरवून तुरुंगात टाकण्यात आले होते. सुटकेनंतर तो फ्रान्सला परतला होता. शोभराज २००३ मध्ये नेपाळला गेला होता. जिथे त्याला अटक करण्यात आली होती. आणि खटला भरण्यात आला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती.
पुढील कहाणी पाहण्यासाठी सिनेरसिकांना इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट पाहावा लागेल.