अनसूया सेनगुप्ताचा Cannes मध्ये डंका, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता (Anasuya Sengupta) हिने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival) अन सर्टेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव दिग्दर्शित 'शेमलेस' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला. एका पोलिसाला भोसकून दिल्लीतील कुंटणखान्यातून पळून जाणाऱ्या एका सेक्स वर्करचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
अनसूयाने हा पुरस्कार जगभरातील क्वियर समुदाय आणि इतर उपेक्षित घटकांना समर्पित केला आहे ज्यांनी अशी लढाई धैर्याने लढली जी त्यांना लढण्याची गरज नव्हती. तिने म्हटले आहे, "तुम्हाला समानतेच्या हक्कासाठी लढण्यासाठी क्वियर असण्याची गरज नाही. वसाहत करणे दयनीय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वसाहतीत राहण्याची गरज नाही – आपण केवळ खूप सभ्य माणूस असणे गरजेच आहे."
दरम्यान, चीनी चित्रपट निर्माते हू गुअन दिग्दर्शित 'ब्लॅक डॉग' ला कान्स अन सर्टेन रिगार्ड पारितोषिक देण्यात आले. तर बोरिस लॉजकीने यांच्या 'द स्टोरी ऑफ सॉलेमाने'ला ज्युरी पारितोषिक मिळाले.
कोण आहे अनसूया सेनगुप्ता?
अनुसयाला मुख्यत: मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखले जाते. सध्या ती गोव्यात राहते. नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'चा सेट डिझाइनसाठी तिने काम केले होते. ती मूळची कोलकाता येथील असून तिने तिचे शिक्षण जाधवपूर विद्यापीठात घेतले. तिने बंगाली दिग्दर्शक अंजन दत्त यांच्या रॉक म्युझिकल मॅडली बंगाली (२००९) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००९ मध्ये अनसूया मुंबईत आली. तिथे तिचा भाऊ अभिषेक सेनगुप्ता चित्रपटांमध्ये काम करत होता. पण, तिला अभिनय क्षेत्रात तितकी संधी मिळाली नाही. यामुळे ती चित्रपटांच्या कला विभागाकडे वळली.
हे ही वाचा :