

Waves Summit 2025 Aamir Khan Shahrukh Khan On Indian Cinema
मुंबई : सुपरस्टार आमिर खान यांनी शुक्रवारी सांगितले की भारत हा चित्रपटप्रेमी देश आहे. परंतु, त्याच्या बहुसंख्य लोकांना चित्रपटगृहांची सुविधा नाही. त्यामुळे भारताला अधिक चित्रपटगृहांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे आमिर खान म्हणाला. पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, त्याने 'स्टूडियोज ऑफ द फ्यूचर: पुटिंग इंडिया ऑन वर्ल्ड स्टूडियो मॅप' या विषयाच्या सत्रात भाग घेतला.
आमिर खान म्हणाला, ''भारत एक सिनेप्रेमी देश आहे, पण अनेक लोकांना चित्रपटगृहे नसल्याने समस्यांचा सामना करावा लागतो. उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की भारतात खूप जास्त थिएटर आणि विविध प्रकारची थिएटर असणे आवश्यक आहे. देशात असे जिल्हे आणि विस्तीर्ण क्षेत्रे आहेत जिथे एकही थिएटर नाही.''
आमिर म्हणाला, "आपल्याकडील स्क्रीन्सची संख्या ही गेल्या काही दशकांमधील प्रमुख समस्या आहे. माझ्या मते, आपण यामध्ये गुंतवणूक करायला हवी. भारतात प्रचंड क्षमता आहे परंतु ती तेव्हाच साकार होऊ शकते जेव्हा आपल्याकडे देशभरात अधिक स्क्रीन असतील. जर तुम्ही तसे केले नाही तर लोक चित्रपट पाहणार नाहीत."
'अनेक जिल्ह्यांमध्ये चित्रपटगृहे नाहीत'
आमिर खान म्हणाला, “मला वाटतं की, आपल्या भारतात आणखी विविध विविध प्रकारच्या थिएटरची गरज आहे. देशात असे जिल्हे आणि अनेक मोठे क्षेत्र आहे, जिथे एकदेखील चित्रपटगृह नाही.
चर्चासत्रात आमिर खानने आकडेवारीही मांडली. "सिनेमा स्क्रीन संख्येच्या बाबतीत भारत अमेरिका आणि चीनपेक्षा खूपच मागे आहे. देशाच्या क्षमतेनुसार आणि येथे राहणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार आपल्याकडे खूप कमी चित्रपटगहे आहेत. भारतात सुमारे १०,००० स्क्रीन आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत ४०,००० स्क्रीन आहेत. म्हणून ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. तर चीनमध्ये ९०,००० स्क्रीन आहेत."
बॉलिवूडचा विचार केल्यास ब्लॉकबस्टर चित्रपटही 3 कोटी प्रेक्षक बघतात. भारताची लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच कमी आहे. यातले 50 टक्के सिनेमागृह हे दक्षिण भारतात आहे. म्हणजे हिंदी चित्रपटांसाठी अवघे 5, 000 चित्रपटगृह शिल्लक राहतात. ब्लॉकबस्टर हिंदी सिनेमा फक्त २ टक्के लोकांपर्यंत पोहोचतोय, मग उरलेली 98% लोक कुठे चित्रपट पाहतात? कोकणसारख्या भागात एकही चित्रपटगृह नाही, असंही आमिरने सांगितले.
तिकीटांचे दर स्वस्त असले पाहिजे - शाहरुख खान
चर्चासत्रात शाहरुख खानही सहभागी झाला होता. शाहरुखनेही तिकीटांचे दर आणि सिनेमागृह याबाबत भाष्य केले. 'भारतीय सिनेमा हा सर्व भाषांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर आपल्याला मोठ्या शहरांपलीकडे विचार केला पाहिजे. छोट्या शहरांमध्ये, ग्रामीण भारतात स्वस्त आणि साधे चित्रपटगृह बांधले पाहिजेत. नाही तर चित्रपट बघणे हे फक्त एका ठराविक वर्गापुरतेच मर्यादित राहील" असे मत शाहरुखने मांडले.