

Chitra Wagh X post on Ajaz Khan's House Arrest show
मुंबई : 'बिग बॉस ७' स्पर्धक एजाज खान आता नव्या रिॲलिटी शो 'हाऊस अरेस्ट' मुळे चर्चेत आहे. हा रिॲलिटी शो 'हाऊस अरेस्ट' २० एप्रिल पासून ओटीटी प्लॅटफॉर्म 'उल्लू'वर स्ट्रीम होत आहे. या शोचे अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा शो वादग्रस्त ठरला आहे. या शोवर अश्लीलतेच्या मर्यादा पार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करून अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केलीय. त्यांनी या शोबद्दल मोठे ट्विट केले असून माहिती व प्रसारण मंत्री यांनी असा प्रकारच्या शोच्या कंटेंटवर मर्यादा घालण्यात याव्यात, अशी मागणी केलीय.
“स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे.
असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री @AshwiniVaishnaw जी यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”
रिॲलिटी शो 'हाऊस अरेस्ट' २० एप्रिल पासून ओटीटी प्लॅटफॉर्म 'उल्लू'वर स्ट्रीम होत आहे. या शोचे अनेक क्लिप्स व्हायरल होत असून त्यामध्ये कंटेस्टेंट कॅमेऱ्यासमोर अश्लील कंटेंट प्रेझेंट करताना दिसत आहेत. त्याशिवाय, आणखी एका क्लिपमध्ये चॅलेंजच्या नावावर कंटेस्टेंटचे कपडे उतरण्याची स्पर्धा सुरु आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कंटेस्टेंट्स कपडे उतरवताना दिसत आहेत.
या प्रकारानंतर सोशल मीडियावरदेखील लोकांचा संताप अनावर झाला आहे.