

nidhi agarwal crowd chaos raja saab event hyderabad
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री निधी अग्रवालला अलीकडेच एका अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागले. ती गर्दीत अडकली होती आणि तिथून बाहेर पडण्यासाठी तिला मोठी कसरत करावी लागली. यावेळी गाडीपर्यंत पोहोचताना तीला गर्दीत धक्काबुक्कीही झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निधी अग्रवालसोबत नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. एका कार्यक्रमातून परतताना चाहत्यांच्या प्रचंड गर्दीने तिला वेढले, त्यामुळे ती पूर्णपणे अडकली. आपल्या कारपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्यामुळे लोकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
निधी अग्रवाल प्रभासच्या आगामी चित्रपट ‘द राजा साब’ मधील ‘सहना सहना’ या गाण्याच्या लॉन्च कार्यक्रमासाठी हैदराबादमध्ये उपस्थित होती. कार्यक्रमानंतर परत जात असताना मोठ्या गर्दीने तिला घेरले. गर्दीत धक्काबुक्कीही झाली, ज्यामुळे तिला कारपर्यंत पोहोचणे कठीण झाले. अखेर ती कारमध्ये बसल्यानंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या लोकांना ‘फॅन्स नाहीत, गिधाडं आहेत’ असे म्हणत त्यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने लिहिले, “लोकांना आपल्या मर्यादा माहित असायला हव्यात. असे वर्तन कधीही स्वीकारार्ह नाही.” दुसऱ्याने म्हटले, “फॅन लव्हच्या नावाखाली कुणालाही असुरक्षित वाटायला लावणे चुकीचे आहे.” अनेकांनी या घटनेला ‘लाजिरवाणी’ असे संबोधले आहे. काहींनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सुरक्षेची योग्य व्यवस्था नसल्यावरही प्रश्न उपस्थित केले.
निधी अग्रवालने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ‘आय स्मार्ट शंकर’, ‘ईश्वरन’, ‘हरी हरा वीरा मल्लु’ यांसारख्या यशस्वी तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.