

pakistan announces a film mera lyari to counter dhurandhar propaganda
पुढारी ऑनलाईन :
पाकिस्तानमध्ये ‘धुरंधर’ या चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने जाहीर केले आहे की, ते ल्यारीची खरी गोष्ट दाखवणारा एक चित्रपट घेऊन येत आहेत.
जगभरात ‘धुरंधर’ या चित्रपटाचे कौतुक होत असताना, पाकिस्तानमध्ये मात्र या चित्रपटावर तीव्र टीका झाली आहे. चित्रपटात पाकिस्तानमधील ल्यारी हा भाग दाखवण्यात आला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, या चित्रपटात ल्यारीचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानने ल्यारीवर आधारित एक चित्रपट बनवण्याची घोषणा केली असून, त्यातून या भागाबद्दल योग्य माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे.
‘मेरा ल्यारी’मध्ये दिसणार ल्यारीची गोष्ट
पाकिस्तानच्या सिंध सूचना विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) एका पोस्टद्वारे नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, येणाऱ्या चित्रपटाचा उद्देश ल्यारीची खरी गोष्ट दाखवणे हा आहे. ‘मेरा ल्यारी’ असे या चित्रपटाचे नाव असून, तो गुन्हेगारी किंवा हिंसेऐवजी त्या भागातील संस्कृती आणि सामान्य जीवनावर आधारित असेल.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
पोस्टमध्ये लिहिले आहे, “चुकीची माहिती वास्तव पुसून टाकू शकत नाही. ल्यारी ही हिंसेसाठी नव्हे, तर संस्कृती, शांतता आणि जिद्दीकरिता ओळखली जाते. जिथे ‘धुरंधर’ प्रचार (प्रोपेगंडा) पसरवते, तिथे ‘मेरा ल्यारी’ लवकरच अभिमान आणि समृद्धीची खरी कहाणी सांगेल. ‘मेरा ल्यारी’ हा चित्रपट जानेवारी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ल्यारीविरोधातील भारतीय प्रचार कधीही यशस्वी होणार नाही.”
‘मेरा ल्यारी’बद्दल माहिती
‘मेरा ल्यारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अबू अलीहा करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आयशा उमर यांनी केली आहे. आयशा उमर, दानानीर मोबीन आणि समिया मुमताज यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ची जोरदार कमाई
दरम्यान, ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 427 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरातील (वर्ल्डवाइड) कमाई 639 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारखे कलाकार आहेत.