

बॉक्स ऑफिसवर सध्या एका कमी बजेटच्या चित्रपटाने मोठ्या सिनेमाला चांगलीच टक्कर दिली आहे. अवघ्या 2 कोटी रुपयांच्या खर्चात तयार झालेला ‘हनुमान अंश’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या यशच्या ‘टॉक्सिक’वर कमाईच्या बाबतीत मात करत आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी ‘हनुमान अंश’ने ‘टॉक्सिक’च्या तुलनेत जवळपास दुप्पट कमाई केली आहे.
नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेला ‘हनुमान अंश’ सध्या थिएटरमध्ये चौथ्या आठवड्यात दाखल झाला आहे. इतके दिवस उलटूनही चित्रपटाची कमाई दोन आकडी संख्येत सुरू आहे. याउलट यश, कियारा आडवाणी आणि नयनतारा यांच्या ‘टॉक्सिक’ची दुसऱ्याच आठवड्यात कमाई एक आकडी संख्येवर आली आहे.
सध्या सिनेमागृहांमध्ये ‘टॉक्सिक’सोबत ‘इरुमुडी’ आणि ‘आवारापन 2’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, या नव्या रिलीजच्या स्पर्धेतही ‘हनुमान अंश’ने आपली पकड कायम ठेवली आहे.
नवव्या दिवशी ‘टॉक्सिक’ची कमाई आणखी घसरली
यशचा ‘टॉक्सिक’ हा मोठ्या बजेटचा आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या सिनेमात यशसोबत कियारा आडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘टॉक्सिक’ने दमदार सुरुवात करत 101.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा वेग हळूहळू कमी होत गेला. पहिल्या दिवशी ‘टॉक्सिक’ने 101.10 कोटी रुपये कमावले. आठव्या दिवशी चित्रपटाची कमाई 5.45 कोटी रुपये होती. नवव्या दिवशी कमाई आणखी कमी होऊन 4.25 कोटी रुपयांवर आली. त्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 239.30 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
चौथ्या आठवड्यातही ‘हनुमान अंश’चा जलवा
‘हनुमान अंश’ 7 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये या चित्रपटाची कमाई फारशी वेगवान नव्हती. मात्र, जसजसा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत गेला, तसतशी त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली.
चित्रपटाच्या 27व्या दिवशी 7.75 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला, तर 28व्या दिवशी कमाईने आणखी मोठी झेप घेत 11 कोटी रुपयांचा आकडा गाठला. या दमदार कामगिरीनंतर चित्रपटाचा एकूण बॉक्स ऑफिस व्यवसाय 72.88 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ‘हनुमान अंश’ला कोणत्याही मोठ्या स्टारकास्टचा आधार नसतानाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.